रोजगारनिर्मिती थांबणे हे विकास ठप्प झाल्याचे द्योतक, प्रियंका गांधींचा घणाघात
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2019 02:11 PM2019-11-21T14:11:43+5:302019-11-21T14:37:39+5:30
काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी पुन्हा एकदा भाजपावर निशाणा साधला आहे.
नवी दिल्ली - काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी पुन्हा एकदा भाजपावर निशाणा साधला आहे. भारताची सर्वात मोठी ताकद म्हणजे देशातील तरुण आहेत. भाजपा सरकारने त्यांच्याकडून नोकऱ्यांची संधी हिरावून घेत मोठा अन्याय केला आहे असं प्रियंका गांधी यांनी म्हटलं आहेय प्रियंका यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून भाजपावर हल्लाबोल केला आहे. तसेच देशात रोजगारनिर्मिती थांबणे हे विकास ठप्प झाल्याचे द्योतक असल्याची टिकाही प्रियंका गांधी यांनी केली आहे.
'देशात रोजगारनिर्मिती थांबणे हे विकास ठप्प झाल्याचे द्योतक आहे. भाजपा सरकारच्या कार्यकाळात या आजाराने मोठ्या आजाराचं रूप घेतलं आहे. बांधकाम क्षेत्रात तब्बल 35 लाख लोकांच्या नोकऱ्यांवर गदा आली आहे. तर माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील जवळपास 40 लाख लोकांच्या नोकऱ्या जाण्याच्या मार्गावर आहेत' असं ट्विट प्रियंका गांधी यांनी केलं आहे. तसेच भारताची सर्वात मोठी ताकद म्हणजे देशातील तरुण आहेत. भाजपा सरकारने त्यांच्याकडून नोकऱ्यांची संधी हिरावून घेत मोठा अन्याय केला आहे असं देखील म्हटलं आहे.
देशाच्या अर्थव्यवस्थेवर आलेले मंदीचे मळभ अद्याप दूर झालेले नाही. प्रत्येक तिमाहीगणिक अर्थव्यवस्थेतील सुस्ती वाढत चालली आहे. त्यामुळे नव्या नोकऱ्या निर्माण होण्याची शक्यता धुसर झाली आहे. त्याबरोबरच खर्चात कपात करण्यासाठी कंपन्या वरिष्ठ आणि मध्यम स्तरावरील कर्मचाऱ्यांची कपात करत आहेत. त्यामुळे 2014 पासून आतापर्यंत केवळ उत्पादन क्षेत्रातील 35 लाख कर्मचाऱ्यांनी रोजगार गमावला आहे. गेल्या काही वर्षांमध्ये बेरोजगारी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. तसेच जीडीपीमध्ये वाढ होऊनही रोजगारनिर्मितीमध्ये म्हणावी तशी वाढ होऊ शकलेली नाही, अशी माहिती आकडेवारीच्या अभ्यासातून समोर आली आहे.
भारत की सबसे बड़ी ताकत यहाँ के युवा हैं। भाजपा सरकार ने उनसे काम के मौके छीनकर बहुत बड़ा अन्याय किया है।
— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) November 21, 2019
अर्थव्यवस्थेतील सुस्तीमुळे विविध क्षेत्रांमधील लाखो रोजगार संकटात आहेत. आयटी कंपन्या, ऑटो कंपन्या, बँका अशा विविध क्षेत्रांमधून खर्चांमध्ये कपात करण्यावर भर देण्यात येत आहे. त्यामुळे परिस्थिती याहून अधिक बिकट होईल, अशी भीती कर्मचाऱ्यांना सतावत आहे. मोठमोठ्या आयटी कंपन्यांनी कामगार कपातीची घोषणा केली आहे, तर काही कंपन्या कामगार कपातीची घोषणा करण्याच्या तयारीत आहेत. याचा सर्वात मोठा फटका वरिष्ठ आणि मध्यम स्तरावरील कर्मचाऱ्यांन बसत आहे.