नवी दिल्ली-
दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी आज पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली आहे. राजधानी दिल्लीत 'जंतर-मंतर'वरुन आम आदमी पक्षानं 'मोदी हटाओ, देश बचाओ' रॅली सुरू केली आहे. रॅलीला संबोधित करताना केजरीवालांनी थेट पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला. मोदींना झोप न येण्याचा आजार झाला आहे. त्यामुळेच ते संतापलेले असतात. त्यांनी स्वत: डॉक्टरांना दाखवायला हवं आणि उपचार सुरू करायला हवेत, असं केजरीवाल म्हणाले.
"झोप न येण्यामुळेच ते सारखे चिडचिड करत असतात आणि सर्वांना तुरुंगात टाकण्याचं काम करतात", असंही केजरीवाल म्हणाले. दिल्लीत मोदींविरोधात लावण्यात आलेल्या पोस्टर्सबाबत काही जणांना तुरुंगात टाकण्यात आलं आहे. याचाच आधार घेत केजरीवालांनी मोदींवर हल्ला केला. मोदी इतके असुरक्षित आणि घाबरले आहेत की पोस्टर चिकटवणाऱ्यालाही तुरुंगात टाकत आहेत, असंही केजरीवाल म्हणाले.
"मला एक भाजपावाला भेटला आणि म्हणाला सर मोदीजी १८ तास काम करतात. ते फक्त तीन तास झोपतात. मी म्हटलं अरे फक्त तीन तास झोपून काम होणार नाही. तर तो म्हणाला की ही मोदींना दैवी शक्ती मिळाली आहे. मी त्याला म्हटलं अरे वेड्या माणसा दैवी शक्ती नाही, हा एक आजार आहे. त्यांना व्यवस्थित पुरेशी झोप घ्यायला सांगा. झोप येत नसेल म्हणजे डॉक्टरांच्या सल्ल्याची त्यांना गरज आहे. झोप न आल्यामुळेच ते संतापलेले असतात. चिडचिड करतात आणि सर्वांना तुरुंगात टाकतात. मी देवाकडे प्रार्थना करेन की त्यांचं आरोग्य उत्तम राहावं", असं केजरीवाल म्हणाले.