काँग्रेसमध्ये बंडखोरी करून आपली वेगळी राजकीय वाटचाल करणारे काश्मीरमधील दिग्गज नेते गुलाम नबी आझाद यांचं आत्मचरित्र प्रकाशित होत आहे. या आत्मचरित्रामधून त्यांनी काँग्रेसबाबत मोठमोठे गौप्यस्फोट केले असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे पुढच्या काळात मोठा वाद निर्माण होऊ शकतो. गुलाम नही आझाद यांचं आझाद हे आत्मचरित्र बुधवारी दिल्लीत प्रकाशित होणार आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कर्ण सिंह या पुस्तकाचं प्रकाशन करणार आहेत.
गुलाम नबी आझाद यांनी या आत्मचरित्रामधून काँग्रेसमध्ये घडलेल्या चुकीच्या गोष्टींचा विस्तृतपणे उहापोह करण्यात आला आहे. २०२२ मध्ये काँग्रेस सोडण्यापूर्वी आझाद हे जवळपास ५५ वर्षे काँग्रेसमध्ये होते. त्यांनी आत्मचरित्रात लिहिलं की, काँग्रेसच्या पतनाचं महत्त्वाचं कारण म्हणजे, हा पक्ष राष्ट्रीय आणि राज्यस्तरावर आपल्याच सक्षम नेतृत्वाविरोधात समानांतर, अक्षम नेतृत्व उभं करून त्याला नष्ट करून टाकतो. या प्रक्रियेने पक्षाला वरपासून खालपर्यंत संपवून टाकलं आहे, असा आरोप आझाद यांनी केला आहे.
तसेच खूशमस्करेगिरी, चाटुकारिता यामुळे पक्षाचं नुकसान होत असल्याचं आझाद यांनी खेदपूर्वक या आत्मचरित्रात नमूद केलं आहे. एका ठराविका काळापासून चाटुकारितेने पक्षामध्ये केंद्रीय स्थान घेतलं आहे. दुर्दैवाने कुणीही हे कटू सत्य ऐकू इच्छित नाही, असे आझाद म्हणाले.
या आत्मचरित्रामध्ये गुलाम नबी आझाद यांनी कलम ३७० हटवण्यात आले, तेव्हाच्या प्रसंगाचाही उल्लेख केला. जेव्हा अमित शाहांनी राज्यसभेमध्ये कलम ३७० हटवण्याची घोषणा केली आणि जम्मू-काश्मीरचं दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजन करण्याचा निर्णय घेतला विरोधी पक्ष नेते धरणे देऊन बसले. मात्र जयराम रमेश त्यात सहभागी झाले नाहीत. ते तेव्हा राज्यसभेतील काँग्रेसचे चिफ व्हिप होते.