नवी दिल्ली : देशातील १२ बंदरांपैकी ३ बंदरे तोट्यात असून, त्यात मुंबई बंदराचा समावेश आहे. त्यांची स्थिती सुधारण्यासाठी काही पावले उचलण्यात येत असून, महसुलात वाढ केली जात असल्याचे केंद्रीय वाहतूक राज्यमंत्री पोन राधाकृष्णन यांनी राज्यसभेत सांगितले. काँग्रेसचे खासदार विजय दर्डा यांनी बंदरांच्या स्थितीबाबत प्रश्न विचारला होता.मुंबई, कोचीन आणि कोलकाता बंदरांना २०१५-१६ मध्ये नुकसान सोसावे लागले. त्यानंतर सरकारने या बंदरांच्या आर्थिक स्थितीवर कायम नजर ठेवण्याचे काम सुरू केले आहे. या बंदरांच्या मालमत्तेचा योग्य वापर करण्यासह जमीन, महसुलात वाढ, स्थापना आणि संचालन खर्च कमी करतानाच क्षमता सुधारण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. खर्चात कपात करण्यावरही भर दिला जाईल, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)सागरमाला कार्यक्रम...जुन्या बंदरांचे आधुनिकीकरण आणि नव्यांचा विकास, बंदरांची आपसात जोडणी, बंदरांवर आधारित औद्योगिक विकास तसेच किनारपट्टीवरील समुदायाचे जीवनमान सुधारण्यावर भर देणे, हे सागरमाला कार्यक्रमाचे उद्दिष्ट असेल. किनारपट्टी आणि सागरी क्षेत्राच्या योग्य विकासासाठी राष्ट्रीय योजना (एनपीपी) तयार करण्यात आली असून, ती सागरमाला कार्यक्रमाचा एक भाग आहे. त्यात १५० पेक्षा जास्त प्रकल्पांची ओळख पटविण्यात आली आहे. एनपीपीसाठी उपयुक्त ठरणाऱ्या निवडक प्रकल्पांचा समावेश पीपीपी मॉडेलमध्ये करण्यात आला असल्याचे राधाकृष्णन यांनी नमूद केले.महाराष्ट्रात ‘साई’साठी १६ कोटींपेक्षा जास्त मदत...भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे(साई)महाराष्ट्रात एक क्षेत्रीय केंद्र, दोन प्रशिक्षण केंद्र, १५ आखाडे, सात विस्तार केंद्र तसेच दोन राष्ट्रीय क्रीडा प्रतिभा स्पर्धा योजना चालविल्या जात आहेत. त्यासाठी २०१५-१६ या वर्षात १६ कोटी ६४ लाख १० हजार रुपये मंजूर करण्यात आल्याचे युवा कार्यक्रम आणि क्रीडा राज्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी खा. दर्डा यांच्या एका प्रश्नाला उत्तर देताना नमूद केले. कांदिवली येथील केंद्रातील क्रीडा सुविधांच्या विकासाबाबत कोणताही वाद नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मुंबईसह तीन बंदरे तोट्यात
By admin | Published: May 13, 2016 4:09 AM