नवी दिल्ली : कोरोना संसर्गाचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव वाढू लागल्यानंतर त्यावरील उपाययोजना आणि मदतीसाठी पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी PM Cares Fund ची स्थापना केली होती. मात्र, आता या फंडाच्या पारदर्शकतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. पीएम केअर फंडाचा हिशोब सार्वजनिक करावा, अशी मागणी १०० माजी सनदी अधिकाऱ्यांनी एका पत्राद्वारे केली आहे.
पंतप्रधाननरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या पत्रात माजी सनदी अधिकाऱ्यांनी पीएम केअर फंडाबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. पीएम केअर फंड हा नागरिकांना आपत्कालीन मदतीसाठी तयार करण्यात आला होता. त्यात जमा झालेला निधी आणि खर्च याचा हिशोब सार्वजनिक करणे आवश्यक आहे. पीएम केअर फंडाबाबत सुरू असलेल्या वादावर आम्ही बारीक लक्ष ठेवून आहोत. ज्या उद्देशाने हा फंड तयार करण्यात आला आणि ज्या पद्धतीने याचे संचालन केले जात आहे, या दोन्हीबाबत अनेक प्रश्नचिन्ह आहेत. त्यावर अद्याप कोणतेही उत्तर आलेले नाही, असे या पत्रात म्हटले आहे.
पीएम केअर फंडाबाबत माहिती अधिकारातूनही माहिती दिली जात नाही. पीएम केअर फंड हा माहिती अधिकार कायद्यानुसार सार्वजनिक प्राधिकरण नाही. पीएम केअर फंड सार्वजनिक प्राधिकरण नाही, तर पंतप्रधान, गृहमंत्री, संरक्षण मंत्री आणि अर्थमंत्री हे पीएम केअर फंडचे सदस्य कसे, असा सवाल या पत्राच्या माध्यमातून करण्यात आला आहे. पीएम केअर फंडाच्या प्रत्येक गोष्टीत पारदर्शकतेचा अभाव आहे. पीएम केअर फंडाची पारदर्शकता सुनिश्चित करावी. आतापर्यंत पीएम केअर फंडात किती निधी जमा झाला आणि किती खर्च करण्यात आला, याचा हिशोब सार्वजनिक करावा, अशी मागणी निवृत्त झालेल्या माजी सनदी अधिकाऱ्यांनी केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या या पत्रावर, माजी आयएएस अधिकारी अनिता अग्निहोत्री, एस. पी. अंब्रोसे, शरद बेहार, सज्जाद हासन, हर्ष मंदर, पी. जॉय ओमेन, अरुणा रॉय, के. पी. फाबियान, देव मुखर्जी, सुजाता सिंह आणि माजी आयपीएस अधिकारी ए. एस. दुलात, पी. जी. जे. नंबूदरी आणि जूलियो रिबेरो यांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत. दरम्यान, पीएम केअर फंडाला आयकरातून सूट देण्यात आली होती. संसदेतही यावरून बराच गदारोळ झाला होता.