शरद गुप्ता, लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि राज्यपाल राहिलेल्या मार्गारेट अल्वा यांना काँग्रेसच्या सांगण्यावरून नव्हे तर, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि सीताराम येचुरी यांच्यासारख्या विरोधी पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांच्या सांगण्यावरून विरोधकांच्या उमेदवार बनविण्यात आले आहे. २०१६ मध्ये आत्मकथन लिहिल्यानंतर अल्वा या काँग्रेसच्या बाहेर होत्या. काँग्रेस नेत्यांचे संबंध शस्त्रास्त्रांचे दलाल क्रिश्चियन आणि त्यांचे वडील वॉल्फगैंग मिशेल यांच्याशी असल्याचे आरोप अल्वा यांनी आत्मकथनातून केले होते. हे पिता-पुत्र अगुस्ता वेस्टलँड हेलिकॉप्टर घोटाळ्यापासून ते अनेक संरक्षण व्यवहारात दलाल होते.
खरे तर विरोधकांकडे कोणताही सक्षम उमेदवार नव्हता. राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत आपला उमेदवार देऊ न शकणारा काँग्रेस पक्ष यंदा आपल्या एखाद्या ज्येष्ठ नेत्याला उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत उमेदवारी देण्याच्या विचारात होता. मात्र, कोणीही तयार नव्हते. शरद पवार आणि येचुरी यासारख्या नेत्यांनी मार्गारेट अल्वा यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला. त्या दक्षिण भारतीय आहेत. महिला आणि अल्पसंख्याक समुदायातील असल्याने अल्वा यांच्याबाबत कितीही विरोध असला तरी काँग्रेस पक्ष विरोध करू शकला नाही.
मार्गारेट अल्वा यांनी २००८च्या कर्नाटक निवडणुकीदरम्यान तिकिटांची विक्री केल्याचाही आरोप राज्य पार्टी शाखेवर केला होता. आपल्या आत्मकथनात त्यांनी दावा केला होता की, जानेवारी १९९२ मध्ये तत्कालीन पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांनी त्यांना सोनिया गांधी यांच्या विरोधानंतरही राज्यसभेत पाठविले होते. सोनिया गांधी या आपले खासगी सचिव विन्सेंट जॉर्ज यांना राज्यसभेत पाठविण्यासाठी इच्छुक होत्या. त्यामुळे नाराज झालेल्या जॉर्ज यांनी नरसिंहराव यांच्याविरुद्ध सोनिया गांधी यांच्याकडे तक्रारी केल्या.
अल्वा यांना दिली होती राज्यपाल पदाची जबाबदारी
२००४ मध्ये उत्तर कन्नड लोकसभा मतदारसंघातून निवडणूक हरल्यानंतर पुढील पाच वर्षांपर्यंत अल्वा या राज्यसभेत पाठविण्यासाठी प्रतीक्षा करत होत्या. पण, सोनिया गांधी यांनी त्यांना केवळ पक्ष संघटनेत जबाबदारी दिली. २००९ मध्ये यूपीए सत्तेत परत आल्यानंतरही त्यांना मंत्रिमंडळात जबाबदारी देण्याऐवजी राज्यपाल केले. त्या उत्तराखंड, राजस्थान, गोवा आणि गुजरातमध्ये २०१४ पर्यंत राज्यपाल होत्या. येथूनच त्यांच्या मनात काँग्रेसबाबत कटुता वाढली. त्यानंतर त्यांनी हा राग आपल्या आत्मकथनातून व्यक्त केला.
१९९५ मध्ये राव यांनी माधवराव शिंदे, कमलनाथ, अर्जुन सिंह, नारायण दत्त तिवारी, विद्याचरण शुक्ला आणि बुटा सिंग यांच्यासारख्या सोनिया गांधी यांच्या निकटवर्तीय नेत्यांविरुद्ध हवाला प्रकरणात सीबीआय चौकशीचे आदेश दिले होते.