नवी दिल्ली – गेल्या काही दिवसांपासून भारत आणि चीन यांच्यात तणाव वाढलेला आहे. मात्र यावरुन देशात काँग्रेस आणि भाजपात राजकारण सुरु झालं आहे. मंगळवारी काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी लडाखमध्ये चीनी सैन्याच्या घुसखोरीवरुन केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना चीनने भारताच्या जमिनीवर कब्जा केला आहे का? असा प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर लडाखमधील भाजपाचे खासदार जामयांग सेरिंग नामग्याल यांनी राहुल गांधींना प्रत्युत्तर दिलं आहे.
भाजपा खासदार जामयांग सेरिंग नामग्याल यांनी काँग्रेसच्या राजवटीत भारताचा जो भूभाग गमावला होता त्याची यादीच दिली. यात अक्साई चीनपासून पैगनक आणि चबजी घाटी, दूमसारख्या प्रदेशांची नावे दिली आहेत. नामग्याल यांनी ट्विटमध्ये दोन फोटो पोस्ट केले आहेत. एकात त्यांचे उत्तर आहे तर दुसऱ्या देमचोक घाटीचा फोटो शेअर केला आहे. काँग्रेसच्या सरकारमध्ये हा प्रदेश चीनच्या ताब्यात गेल्याचा दावा त्यांनी केला आहे. १९६२ मध्ये काँग्रेसच्या काळात अक्साई चीन(३७ हजार २४४ किमी), यूपीए काळात २००८ मध्ये चुमूर परिसरातील तिया पैगनक आणि चाबजी घाटी(२५० मीटर) तसेच २००८ मध्येच चीनी सैन्याने देमजोकमध्ये जोरावर किल्ला उद्ध्वस्त केला.
त्याचसोबत २०१२ मध्ये पीएलएने ऑब्जर्विंग पॉईंट बनवला, १३ सिमेंटच्या घरांसह चीनी, न्यू देमजोक कॉलनी बसवण्यात आली. यूपीएच्या काळात भारताने दुंगटी आणि देमचोकमधील दूम चेले हा प्रदेश गमावला.
नामग्याल यांच्या ट्विटनंतर राहुल गांधी यांनी दुसरं ट्विट केले, त्यात राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केले. त्यात त्यांनी म्हटलं आहे की, चीनने घुसखोरी करत लडाखमधील आपली जमीन ताब्यात घेतली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी गप्प बसले, गायब झाले असा आरोप करण्यात आला आहे. राहुल गांधीसह अनेक काँग्रेस नेते चीनच्या घुसखोरीवरुन केंद्र सरकारवर निशाणा साधत आहेत.
रविवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर राहुल गांधींनी खापर फोडलं. शहा एका वर्चुअर रॅलीत म्हणाले, भारताची संरक्षणनीती जगात स्वीकारली जात आहे. संपूर्ण जगाचा असा विश्वास आहे की अमेरिका आणि इस्त्राईल नंतर आपल्या सीमांचे रक्षण करू शकेल असा कोणता देश असेल तर तो भारत आहे. त्यावर कॉंग्रेस खासदाराने मिर्झा गालिब यांच्या शायरीत बदल करुन म्हटलं होतं की, सीमेचे वास्तव प्रत्येकाला ठाऊक आहे पण, मनाच्या समाधानासाठी 'शहा-याद' विचार करणं हे चांगलं आहे.