लेह (लडाख) - भारतीय सैन्याच्या जवानांनी मंगळवारी पूर्व लढाखमध्ये एका मोठा युद्धसराव केला. या युद्धसरावामध्ये हवाई दल आणि लष्कराच्या अनेक तुकड्यांमधील जवान सहभागी झाले होते. येथून चीनची सीमा जवळच असल्याने रणनीतिक पातळीवर हा युद्धसराव खूप महत्त्वपूर्ण मानला जात आहे. लडाखमधील या भागात भारतीय सैन्यातील जवानांनी कुठल्याही प्रकारचा युद्ध सराव करण्याची ही पहिलीच वेळ आहे. विशेष बाब म्हणजे लष्कराच्या नॉर्दन कमांडचे लेफ्टिनंट जनरल रणबीर सिंह हे सुद्धा या युद्धसरावासाठी उपस्थित होते. दरम्यान, नॉर्दन कमांडकडून या युद्धसरावाची काही छायाचित्रे सोशल मीडियावर शेअर करण्यात आली आहेत.
लडाखच्या काही भागामध्ये चिनी सैन्याकडून सातत्याने घुसखोरीचे प्रयत्न होत असतात. त्यामुळे अनेकदा भारत आणि चीनचे सैनिक याभाहात आमनेसामने येतात. अशा परिस्थितीत भारतीय जवानांनी हा युद्धसराव करून चीनला कठोर संदेश दिला आहेत. या युद्धसरावासाठी भारतीय जवानांनी आधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज अशा शस्रास्रांचा वापर केला होता.
हल्ली काही दिवसांपूर्वीच लडाखमध्ये भारत आणि चिनी सैन्याचे जवान आमने-सामने आले होते. लडाखमधील पँगाँग सरोवराजवळ भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये बाचाबाची झाली होती. त्यानंतर दोन्ही देशांत प्रतिनिधी मंडळ स्तरावर चर्चा झाली. त्यानंतर या परिसरातील परिस्थिती निवळली होती. लडाखमध्ये भारत आणि चीनमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषा असून दोन्ही देशांमध्ये अजूनही सीमावाद सुरू आहे. मात्र या वादाचा दोन्ही देशांच्या संबंधांवर परिणाम होणार नसून दोन्ही देश चर्चा सुरू ठेवतील, असे दोन्ही देशांकडून सांगितले जाते.