लेडी सिंघम! विद्यार्थिनी बनून ती कॉलेजमध्ये जायची... कॅम्पसमध्ये फिरायची... मुला-मुलींशी मैत्री करायची, अन्...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2022 03:51 PM2022-12-12T15:51:25+5:302022-12-12T15:52:42+5:30
मध्यप्रदेश मधील एका महिला पोलिसाने रँगिगचा प्रकार उघडीस आणला आहे. या महिला पोलिसाने स्वत: विद्यार्थी असल्याचे भासवून हे प्रकरण उघड केले आहे.
मध्यप्रदेश मधील एका महिला पोलिसाने रँगिगचा प्रकार उघडीस आणला आहे. या महिला पोलिसाने स्वत: विद्यार्थी असल्याचे भासवून हे प्रकरण उघड केले आहे. रॅगिंग प्रकरणी आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. एका महिला पोलिसाने विद्यार्थिनीच्या वेशात मेडिकल कॉलेज गाठले. ती विद्यार्थ्यांमध्ये इतकी मिसळली की ती पोलीस असल्याची शंका कुणालाही आली नाही. विद्यार्थिनी असल्याचं दाखवून या मुलीने अंडरकव्हर एजंट म्हणून काम केलं आणि त्यानंतर मध्य प्रदेशातील एका प्रसिद्ध कॉलेजमध्ये रॅगिंगचा प्रकार उघडकीस आणला. हे प्रकरण इंदूरच्या प्रसिद्ध महात्मा गांधी मेमोरियल मेडिकल कॉलेजशी संबंधित आहे.
एका विद्यार्थ्याने यूजीसीकडे रॅगिंगची तक्रार केली होती. यानंतर महाविद्यालय प्रशासनाने २४ जुलै रोजी अज्ञात विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. विद्यार्थ्याने यूजीसी हेल्पलाइनवर रॅगिंगशी संबंधित संपूर्ण माहिती दिली होती. मात्र तक्रारदाराने आपले नाव व आरोपी विद्यार्थ्यांची नावे दिली नाहीत. या तक्रारीत सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून झालेल्या चॅटचे स्क्रीनशॉटही देण्यात आले आहेत. मात्र या गप्पांमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्याचा क्रमांक देण्यात आला नाही.
भारीच! अपयश आलं पण खचली नाही; 12वी नापास झालेली 'ती' IAS अधिकारी; प्रेरणादायी प्रवास...
पोलीस अधिकारी तहजीब काझी यांनी महिला कॉन्स्टेबल शालिनी चौहान यांना नर्सिंग कॉलेजच्या प्रथम वर्षाची विद्यार्थिनी बनवून मेडिकल कॉलेजमध्ये पाठवले होते. अंडरकव्हर पोलीस शालिनी चौहान यांनी संपूर्ण ऑपरेशन अतिशय चांगल्या प्रकारे पार पाडले. अनेकवेळा महाविद्यालयीन विद्यार्थिनींनी महिला कॉन्स्टेबल शालिनीवर संशय घेतला, मात्र महिला कॉन्स्टेबलने चतुराईने विद्यार्थिनींना गोंधळात टाकले आणि ती नर्सिंगची वैद्यकीय विद्यार्थिनी असल्याचे सांगितले.
यानंतर ज्युनिअर विद्यार्थ्यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवून रॅगिंगमध्ये सहभागी असलेल्या विद्यार्थ्यांची नावे उघड करून व्हॉट्सअॅप चॅट्सही दाखवले. अंडरकव्हर एजंट, पोलीस ठाण्याचे प्रभारी काझी आणि पोलीस आयुक्त हरिनारायण चारी मिश्रा यांच्यात दररोज बैठक होते. बैठकीत दुसऱ्या दिवशीची रणनीती ठरविण्यात आली. अखेर 2 महिन्यांनंतर पोलिसांना मोठे यश मिळाले.
एका महिला पोलीस कॉन्स्टेबलला महाविद्यालयात पाठवण्यात आले, महाविद्यालयात त्यांनी स्वत: वैद्यकीय विद्यार्थिनी असल्याचे सांगितले. मेडिकलची विद्यार्थिनी बनून त्या कॉलेजमध्ये राहू लागल्या आणि रॅगिंगच्या या प्रकरणाशी संबंधित माहिती गोळा करू लागल्या. ही महिला पोलीस इतर विद्यार्थिनींसोबत अगदी आरामात राहायच्या. गुप्त राहून या महिला पोलिसाने या प्रकरणाशी संबंधित प्रत्येक पैलू शोधून काढले. तर दुसरी महिला पोलीस कॉन्स्टेबलने परिचारिकेची भूमिका बजावली होती, तर दोन कॉन्स्टेबलनाही या प्रकरणाची उकल करण्यासाठी कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये पाठवण्यात आले होते. संपूर्ण तपासात गुन्ह्याचे केवळ दुवेच उकलले नाहीत, तर तपासाअंती पोलिसांनी या गुन्ह्यात सहभागी असलेल्या 11 विद्यार्थ्यांचीही ओळख पटवली आहे.
आरोपी सिनियर विद्यार्थ्यांनी ज्युनियर विद्यार्थ्यांची रॅगिंग केल्याचे तपासात समोर आले आहे. या विद्यार्थ्यांना अश्लील कृत्य करायला लावले. या प्रकरणी आता विद्यार्थ्यांना आयपीसी कलमांतर्गत नोटीस पाठवण्यात आली असून त्यांना तपासात सहकार्य करण्यास सांगण्यात आले आहे. कोर्टात आरोपपत्र दाखल होईल तेव्हा कोर्टात हजर राहा, असेही विद्यार्थ्यांना सांगण्यात आले आहे. 11 विद्यार्थ्यांची यादी मिळाल्यानंतर कॉलेज व्यवस्थापनाने या आरोपी विद्यार्थ्यांना तीन महिन्यांसाठी निलंबित केले आहे.
शालिनी सुमारे 2 महिने एमजीएम कॉलेजमध्ये राहिल्याचं सांगण्यात येत आहे. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला, कॅन्टीनमध्ये वेळ घालवला आणि ज्येष्ठ विद्यार्थ्यांवर लक्ष ठेवले. कॉलेजमधील ज्येष्ठ विद्यार्थ्यांचे वर्तन अत्यंत आक्रमक होते. सर्व प्रकारचे पुरावे गोळा केल्यानंतर या महिला पोलिसाने आपला अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिला होता. त्यानंतर मेडिकल कॉलेजमध्ये सुरू असलेल्या रॅगिंगचा प्रकार उघड झाला आहे.