दौसा: राजस्थानच्या दौसा जिल्ह्यात एका महिला डॉक्टरनं आत्महत्या केली आहे. गर्भवतीच्या मृत्यूनंतर डॉक्टरविरोधात हत्येचा गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर डॉक्टरनं आत्महत्या करून स्वत:ला संपवलं. अर्चना शर्मा असं या डॉक्टरचं नाव आहे. मी कोणतीही चूक केली नाही, मी कोणालाही मारलेलं नाही. पीपीएच एक गुंतागुंत आहे. त्यासाठी डॉक्टरांना त्रास देणं बंद करा, असं शर्मांनी यांनी सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे. माझ्या मुलाला आईची उणीव जाणवू देऊ नका, असं त्यांनी नोटच्या शेवटी म्हटलं आहे.
दौसा जिल्ह्यातल्या लालसोटमधील आनंद रुग्णालयात एका महिलेचा प्रसूतीदरम्यान मृत्यू झाला. त्यानंतर महिलेच्या कुटुंबीयांनी आणि ग्रामस्थांनी रुग्णालयामध्ये गोंधळ घातला. रुग्णालयाचे डॉ. सुनित उपाध्याय आणि त्यांच्या पत्नी डॉ. अर्चना शर्मा यांच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर सोमवारी रात्री दीड वाजता रुग्णालयातला गोंधळ थांबला.
मंगळवारी सकाळी डॉ. अर्चना शर्मांनी गळफास लावून आत्महत्या केली. पोलिसांना त्यांच्या मृतदेहाजवळ सुसाईड नोट सापडली. डॉक्टरांचं घर रुग्णालयापासून ३०० मीटरवर आहे. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल झाल्यानं अर्चना यांनी आत्महत्या केल्याचा आरोप त्यांच्या पतीनं केला.
अर्चना यांच्या मृत्यूनंतर त्यांचे पती डॉ. सुनित उपाध्याय यांनी पोलिसात एफआयआर नोंदवला. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. मृत गर्भवतीच्या कुटुंबीयांनी दाखल केलेल्या एफआयआरचादेखील तपास सुरू आहे. अर्चना यांच्या आत्महत्येनंतर खासगी रुग्णालयांच्या संघटनेनं दौसामधील सर्व खासगी रुग्णालयं बुधवारी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला.