ऑनलाइन लोकमत
बंगळुरू, दि. 22- जर तुम्ही इंडस ओएसवर आधारित स्मार्टफोन वापरत असाल तर तुम्हाला आता टाइप केलेला मजकूर एका क्लिकवर भाषणाच्या स्वरूपात ऐकायला मिळणार आहे आणि तोसुद्धा तुमच्या बोली भाषेमध्ये. ही गोष्ट जरी सहजासहजी पटणारी नसली तरीसुद्धा हे आता शक्य होणार आहे. मजकूराला भाषणात रूपांतरीत करण्याचं तंत्रज्ञान डॉ. हेमा मुर्थी या बाईंमुळे शक्य होतं आहे. हे नवं तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी हेमा मुर्थी यांनी पंधरा वर्ष काम केलं आहे. द इकोनॉमिक टाइम्सने ही बातमी दिली आहे.
प्रोफेसर मुर्ती आयआयटी मद्रासच्या कॅम्पसमध्ये दररोज सकाळी कॉफी घेत असताना मोबाइलवरील मजकूराचं भाषणात कसं रूपांतर करता येइल याबद्दल विचार करत असत. मजकूराचं 8 भारतीय भाषांमध्ये संभाषणात रूपांतर करण्याचा त्यांचा मानस होता. त्यानुसार काम करून त्यांनी स्मार्टफोनला 8 भारतीय भाषा शिकविल्या आहेत. हेमा मुर्थी जेव्हा या विषयावर रिसर्च करत होत्या त्याचदरम्यान इंडस ओएसचे सीईओ राकेश देशमुख अशाच प्रकारचं संभाषण व्यासपीठ विकसित करण्याच्या विचारात होते ज्यामुळे स्थानिक ऑपरेटिंग सिस्टम आणखी वाढेल.
2015 मध्ये इंडस ओसेने हेमा मुर्थी यांच्या टेक्स टू स्पीच या प्रणालीबरोबर काम करायला सुरूवात केली होती. याचा परिणाम म्हणजे टेक्स टू स्पीच ही प्रणाली. मजकूराला भाषणात रूपांतरीत करण्याचं हे तंत्रज्ञान मायक्रोमॅक्स, सेल्कोन, कार्बन आणि स्वाईप या स्मार्टफोनमध्ये वापरायला मिळतं आहे. डॉ. हेमा मुर्थी यांनी कॉम्युटर सायन्समधून पीएचडी केली आहे. भाषण प्रक्रियेतील विविध गोष्टी करून पाहणं यामध्ये त्यांचा जास्त रस होता. त्याचाच उपयोग करून त्यांनी मजकूराचं भाषणात रूपांतरीत करण्याचं तंत्रज्ञान विकसित केलं आहे. "भारतीय भाषांमध्ये विविधता आहे. प्रत्येक भाषा एकमेकांपासून पूर्णपणे वेगळी आहे. म्हणूनच एखादं डिवाइस जे इंग्रजीमध्ये लिहीलेला मजकूर इतर भाषेमध्ये भाषणाच्या स्वरूपात रूपांतरीत करेल, ते तयार करण्याचा मी विचार केला, असं मत हेमा मुर्थी यांनी व्यक्त केलं.