सुरत : कोरोना साथीचा ‘हॉटस्पॉट’ ठरलेल्या सुरत शहरात रात्रीच्या संचारबंदीचे उल्लंघन करून मोटारीने फिरणाऱ्या मंत्र्याच्या मुलास व त्याच्या तीन मित्रांना अटक करणा-या सुनीता यादव या महिला पोलीस शिपायाचे सोशल मीडियात ‘महिला सिंघम’ म्हणून कौतुक होत आहे.
सुरत जिल्ह्यातील वरछा मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर निवडून आलेले गुजरातचे आरोग्य राज्यमंत्री कुमार कनानी यांचा मुलगा प्रकाश व त्याच्या तीन मित्रांना पोलीस शिपाई यादव यांनी रविवारी रात्री संचारबंदी असतानाही फिरताना अडविले तेव्हा प्रकाशने वडिलांचा हवाला देत यादव यांच्याशी हुज्जत घातली होती; पण कोणताही मुलाहिजा न ठेवता यादव यांनी मंत्रीपुत्रास अटक केली.
या प्रकरणानंतर यादव यांना वरिष्ठांनी खडसावल्याचे कळते. कर्तव्य बजावूनही वरिष्ठ साथ देत नसल्याने आपण पोलीसच्या नोकरीचा राजीनामा दिल्याचे यादव यांनी वृत्तवाहिन्यांना सांगितले. मात्र, सुरतचे पोलीस आयुक्त ब्रह्मभट्ट यांनी त्याचा इन्कार केला व यादव यांनी अजून तरी राजीनामा दिलेला नाही व चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांना राजीनामा देताही येणार नाही, असे सांगितले. यावर यादव यांनी नोकरी सोडून मंत्री कनानी यांच्याविरुद्धच आगामी निवडणूक लढवावी, असे नेटिझन्सनी सुचविले. (वृत्तसंस्था)