राजस्थानमध्ये एक अजब घटना समोर आली आहे. अनुपगडमधील गाव घरसाना पोलीस स्टेशन हद्दीतील रहिवासी असलेल्या 38 वर्षीय मनप्रीत कौर पाण्याच्या टाकीवर चढल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. कौटुंबिक जमिनीच्या वादातून त्यांनी हे पाऊल उचलल्याचं म्हटलं जात आहे. महिला टाकीवर चढल्याची माहिती स्थानिक लोकांनी प्रशासन आणि पोलिसांना दिली. महिलेने खाली येण्यास नकार दिल्याने घटनास्थळी पोहोचलेल्या पोलीस आणि प्रशासनाला खूप वेळ वाट पाहावी लागली.
बराच वेळ समजूत काढल्यानंतर आणि आश्वासनानंतर 38 वर्षीय मनप्रीत कौर खाली येण्यास तयार झाली. हे संपूर्ण प्रकरण कौटुंबिक संपत्तीच्या वादातून समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पाण्याच्या टाकीवर चढलेल्या कौरचा सासरच्यांसोबत वाद सुरू होता. कौर याचा आरोप आहे की, तिच्या पतीच्या वाट्याची जमीन बळजबरीने बळकावली आहे. हे प्रकरणही न्यायालयात प्रलंबित आहे.
टाकीवर चढून मनप्रीत कौरने स्थानिक प्रशासनाकडे पतीच्या वाट्यावरील जमिनीवर कब्जा करणाऱ्या सासरच्या लोकांना हटवण्याची मागणी केली. प्रकरण न्यायालयात असल्याने न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन स्थानिक पोलीस व प्रशासनाने दिले.
सासरच्या मंडळींशी बोलणी करून तोडगा काढण्याचे आश्वासन दिल्यानंतर कौर टाकीवरून खाली उतरली. महिला सुखरूप खाली उतरल्यानंतर प्रशासन आणि पोलिसांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. खूप वेळ हा प्रकार चालला आणि बघ्यांची गर्दीही बराच वेळ घटनास्थळी कायम होती. या संपूर्ण घटनेचा एक व्हिडिओही समोर आला असून तो परिसरात व्हायरल होत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"