जौनपूर - मुन्ना बजरंगी उर्फ डॉन प्रेम प्रकाश सिंह हा उत्तर प्रदेशच्या जौनपूर जिल्ह्यातील पुरेदयाल गावचा रहिवासी होता. 1967 साली जन्मलेल्या मुन्नाला उत्तम शिक्षण देऊन मोठा माणूस बनवायचं स्वप्न वडिलांनी पाहिलं होतं. पण, पाचवीत नापास झाल्यानंतर मुन्ना गुन्हेगारी विश्वाकडे वळला आणि आपली गँगस्टर होण्याची इच्छा त्यानं पूर्ण केली.
स्वतःजवळ शस्त्र आणि बंदुक बाळगण्याचा छंद असलेल्या मुन्नाने सर्वप्रथम 1984 मध्ये लूटमारीच्या उद्देशानं एका व्यापाऱ्याची हत्या केली. त्यानंतर 90 च्या दशकात तो पूर्वांचलमधील बाहुबली माफिया आणि राजकीय पुढारी मुख्तार अन्सारीच्या टोळीत सामील झाला. मुख्तार अन्सारी पुढे समाजवादी पक्षाकडून आमदार बनला होता. त्यामुळे मुन्नाला राजकीय वरदहस्त मिळाला. 1995 साली मुन्ना बजरंगीला एसटीएफने (स्पेशल टास्क फोर्स) घेरले होते. त्यावेळी त्यास गोळीही लागली, पण तो बचावला.
* आमदाराचा भरदिवसा खून2005 साली मुहम्मदाबादचे भाजप आमदार कृष्णानंद राय यांची हत्या केल्याचा आरोप मुन्नावर ठेवण्यात आला. त्याने आपल्या सहकाऱ्यांसह कृष्णानंद राय यांच्या गाडीवर AK47 रायफलमधून तब्बल 400 गोळ्या झाडल्या होत्या. त्यामुळे गुन्हे जगतात मुन्नाची दहशत अधिकच वाढली.
* खंडणी वसुलीचा धंदामुन्नाने आपल्या गुंडागर्दीचा आणि दहशतीचा वापर करुन उत्तर प्रदेशमधील कोळसा आणि भंगार व्यापाऱ्यांकडून कोट्यवधी रुपयांची खंडणी वसूल केली. मात्र, 2009 साली उत्तर प्रदेश पोलिसांसमोर मुन्नाने आत्मसमर्पण केले.
* राजकारणात प्रवेश2012 साली उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत मडियाहू मतदारसंघातून मुन्नाने उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, मुन्नाला पराभवाचा सामना करावा लागला. मुन्ना बजरंगी यापूर्वी जौनपूर, सुलतानपूर, तिहार, मिर्झापूर, झांसी आणि पिलीभीत येथील तुरुंगात होता. 16 जून 2017 रोजी त्याला झांसी येथील तुरुंगात शिफ्ट करण्यात आले होते.
दरम्यान, माझ्या नवऱ्याचा जिवाला धोका असून त्यांचा तुरुंगात फेक एनकाऊंटर केला जाऊ शकतो, असे मुन्नाची पत्नी सीमा सिंह यांनी काही दिवसांपूर्वीच ट्विट केले होते. याप्रकरणी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लक्ष घालावे अशी मागणीही त्यांनी केली होती.