लखीमपूर : उत्तर प्रदेशातील लखीमपूरमध्ये (Lakhimpur) बुधवारी दोन बहिणींचे मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. हे प्रकरण लखीमपूर खेरी येथील निघासन (Nighasan) कोतवालीचे आहे. याप्रकरणी पोलिसांनी कुटुंबीयांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला असून चार जणांना ताब्यात घेतले आहे. पोलीस भादंविच्या कलम 302, 323, 452 आणि 376 नुसार गुन्हा दाखल करून प्रकरणाचा तपास करत आहेत.
याप्रकरणी मृत मुलींच्या कुटुंबीयांनी गंभीर आरोप केला आहे. आरोपींनी दोन्ही मुलींना घरातून पळवून नेले, बलात्कार करून त्यांची हत्या करून मृतदेह झाडाला लटकवल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. ही संपूर्ण घटना निघासन कोतवाली परिसरातील तमोलिनपुरवा गावातील आहे. लखनऊ रेंजच्या आयजी लक्ष्मी सिंह या घटनेचा तपास करत आहेत. "लखीमपूर खेरी येथील गावाबाहेरील एका शेतात दोन मुलींचे मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळले. मृतदेहांवर कोणतीही जखम आढळली नाही. शवविच्छेदनानंतर इतर गोष्टी कळतील, तपास सुरू आहे, असे त्यांनी सांगितले.
काय म्हणाले डीएम?लखीमपूरचे डीएम महेंद्र बहादूर सिंह यांनी फोनवरून एक वृत्तवाहिनीला या घटनेसंदर्भात माहिती दिली आहे. दोन्ही मुलींच्या शवविच्छेदनानंतर हत्येचे कारण समजेल, असे त्यांनी सांगितले. गुरुवारी सकाळी दोन्ही मुलींचे पोस्टमार्टम करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, या घटनेबाबत उत्तर प्रदेशचे एडीजी (ADG) कायदा आणि सुव्यवस्था प्रशांत कुमार यांनीही भाष्य केले आहे. लखीमपूर येथील घरापासून काही अंतरावर दोन बहिणींचे मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आल्याचे त्यांनी म्हटले आहे. एसपी घटनास्थळी पोहोचले आहेत. नातेवाईकांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्व प्रकरणाचा योग्यरित्या तपास करण्यात येईल, असेही प्रशांत कुमार यांनी म्हटले आहे.
विरोधकांचा सरकारवर जोरदार निशाणाया प्रकरणावरून लखीमपूरमध्ये वातावरण तापले आहे. विरोधकांनी योगी सरकारला निशाण्यावर धरले आहे. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांनी ट्विट करत गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी ट्विट करत म्हटले आहे की, ''निघासन पोलीस ठाण्याच्या परिसरात दोन बहिणींचे अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली. तर पीडित मुलींच्या वडीलांनी पोलिसांवर आरोप केले आहेत की, पंचनामा आणि कुटुंबीयांच्या सहमतीशिवाय मृतदेहांचे पोस्टमार्टम करण्यात आले. लखीमपूरमधील शेतकऱ्यांनंतर आता दलितांच्या हत्या 'हाथरस'मधील घटनेची पुनरावृत्ती आहे.''
महिलांवरील गुन्हे का वाढत आहेत? प्रियंका गांधींचा सवालकाँग्रेस नेत्या प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांनीही या प्रकरणावरून सरकारवर निशाणा साधला आहे. "उत्तर प्रदेशातील लखीमपूर येथे दोन बहिणींच्या हत्येची घटना हृदयद्रावक आहे. कुटुंबियांचा आरोप आहे की त्या मुलींचे दिवसाढवळ्या अपहरण करण्यात आलं होतं. वृत्तपत्रे आणि टीव्हीवर दररोज खोट्या जाहिराती दिल्याने कायदा आणि सुव्यवस्था चांगली होत नाही. उत्तर प्रदेशामध्ये महिलांवरील गुन्हे का वाढत आहेत? " असे ट्विट प्रियंका गांधी यांनी केले आहे.