पंजाब - लखीमपूर खेरीमध्ये आंदोलक शेतकऱ्यांवर गाडी घातल्याने चार शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर उसळलेल्या दंग्यात भाजपाचे 4 कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेनं देशातील राजकीय वातावरण ढवळून निघाले असून केंद्रीय राज्य मंत्र्याच्या मुलाला वाचविण्याचा प्रयत्न सरकारकडून होत असल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहेत. मात्र, या हिंसाचारात एकूण 9 जणांना मृत्यू झाला असून एका पत्रकारालाही आपला जीव गमवावा लागला आहे. त्यापैकी, 5 जणांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 50 लाख रुपयांच्या मदतीची घोषणा करण्यात आली आहे.
लखीमपूर खेरी येथील घटनेनं देशभरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. या दुर्घटनेत एकूण 9 जणांचा मृत्यू झाला असून 4 शेतकरी आणि 1 पत्रकाराचा समावेश आहे. त्यामुळे, पंजाब आणि छत्तीसगढ सरकारने मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना 50 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीसिंह चन्नी यांनी राहुल गांधीसमवेत घटनास्थळाला भेट दिली. तसेच, शहीद झालेल्या 4 शेतकरी आणि एका पत्रकाराच्या कुटुंबीयांस पंजाब सरकारकडून 50 लाख रुपयांची मदतही चन्नी यांनी जाहीर केली. दरम्यान, छत्तीसगढचे मुख्यमंत्री भुपेश बघेल यांनीही 4 शेतकरी आणि 1 पत्रकार यांच्या कुटुंबीयांस प्रत्येकी 50 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. तसेच, सरकार शेतकऱ्यांसोबत असल्याचेही त्यांनी म्हटले.
महाराष्ट्र बंदची घोषणा
राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेसची आघाडी असलेल्या महाविकास आघाडीने 11 ऑक्टोबरला लखीमपूर खेरी प्रकरणाचा निषेध व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे, असे राज्याचे मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले. हा बंद पक्षांच्या वतीने असून राज्य सरकारच्या वतीने नाहीय असे देखील पाटील यांनी स्पष्ट केले. तसेच महाविकास आघाडीमधील इतर मित्रपक्षासोबत देखील आम्ही बोलणार आहोत, असेदेखील ते म्हणाले.