कानपूर - उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरीमध्ये ३ ऑक्टोबर रोजी झालेल्या हिंसाचारप्रकरणी अटक केलेला केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांचा पुत्र आशिष याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. शेतकरी आंदोलन करत असताना, त्यांच्यावर वाहने घालण्यात आल्याचा आरोप त्याच्यावर आहे. त्यावेळी झालेल्या हिंसाचारात चार शेतकऱ्यांसह आठ जण ठार झाले होते.
उत्तर पोलिसांच्या गुन्हा अन्वेषण शाखेने आशिष मिश्रा याची सुमारे १२ तास चौकशी केल्यानंतर त्याला अटक केली. आशिष मिश्राच्या पोलीस रिमांडसाठी न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर अर्ज दाखल झाल्यानंतर त्यास 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. आता, आशिष मिश्रा यास रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपर पोलीस अधीक्षक आणि याप्रकरणाचा तपास करणाऱ्या टीमचे सदस्य अरुण कुमार सिंह यांनी आशिष मिश्रा यांना डेंग्यूची लक्षणे दिसल्याचे सांगितले. तसेच, ताप आणि डेंग्यूसदृश्य लक्षणे असल्याने त्यांचे सँपल तपासणीसाठी पाठविण्यात आले असून आशिष यांनाही वैद्यकीय तपासासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केल्याचे सिंह यांनी सांगितले.
दरम्यान, लखीमपूर खेरीमध्ये ज्या वाहनांखाली चिरडून शेतकरी ठार झाले, त्यापैकी एका वाहनात आशिष मिश्राही होता असा आरोप आहे. याप्रकरणी गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांचे पुत्र आशिष यांच्यासह 13 जणांना पोलिसांनी अटक केली आहे.