नवी दिल्ली - उत्तर प्रदेशच्या लखीमपूरमध्ये झालेल्या हिंसाचारात (Lakhimpur Kheri Violence) आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू झाला आहे. हिंसाचारासंदर्भात केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांचा मुलगा आशिष मिश्रा विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तर दुसरीकडे काही शेतकरी नेत्यांनी आशिष मिश्राच्या अटकेची मागणी केली होती. अजय मिश्रा मात्र आपला मुलगा यामध्ये सहभागी नव्हता असं सांगत आहेत. कार आपल्याच मालकीची आहे याची कबुली देताना मिश्रा यांनी गाडीवर दगड, विटांचा हल्ला झाल्याने ताबा गेला आणि ही दुर्घटना झाली असा दावा केला आहे. या घटनेचे अनेक व्हिडीओ समोर येत असून वेगवेगळे दावे केले जात आहे. याच दरम्यान आता अंगावर काटा आणणारा आणखी एक नवा व्हिडीओ समोर आला आहे.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाला असून यामध्ये एक थार गाडी वेगाने येऊन शेतकऱ्यांना चिरडून पुढे जात असल्याचं दिसत आहे. या व्हिडीओमध्ये शेतकरी हातात काळे झेंडे घेऊन एकत्र पुढे जात असलेले पाहायला मिळत आहेत. याचवेळी अचानक पाठीमागून एक गाडी वेगाने पुढे येथे आणि शेतकऱ्यांना चिरडून पुढे जाते. त्यानंतर त्यापाठोपाठ दोन आणखी गाड्या वेगाने निघून जातात. या घटनेने नंतर एकच गोंधळ उडतो. शेतकरी जीव वाचवण्यासाठी इकडे-तिकडे पळू लागतात. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. या घटनेचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. काँग्रेससह इतर नेत्यांनी घटनेचा एक व्हिडीओ शेअर करत पंतप्रधान नरेद्र मोदींसह भाजपावर निशाणा साधला होता.
"शेतकऱ्यांना चिरडणारी ती कार आमचीच पण..."; अखेर केंद्रीय मंत्री अजय मिश्रांनी स्वत:च दिली कबुली
अजय मिश्रा टेनी यांनी कारबाबत महत्त्वाची कबुली दिली आहे. "शेतकऱ्यांना चिरडणारी ती कार आमचीच" असल्याचं म्हटलं आहे. "पहिल्या दिवसापासून आम्ही म्हणतोय की शेतकऱ्यांना चिरडणारी ती थार कार आमची आहे. ती आमच्या नावाने नोंदणीकृत आहे. ही कार काही कार्यकर्त्यांना घेऊन कोणाला तरी आणण्यासाठी जात होती. त्यावेळी माझा मुलगा दुसऱ्या ठिकाणी होता. तो सकाळी अकरा ते संध्याकाळपर्यंत दुसऱ्या कार्यक्रमाचे आयोजन करत होता. माझा मुलगा आशिष मिश्रा घटनास्थळी नाही तर कार्यक्रमस्थळी उपस्थित होता, तिथे हजारो लोक होते. त्याचे तिथले फोटो आणि व्हिडीओ देखील आहेत. जर तुम्हाला त्याचा कॉल रेकॉर्ड आणि सीडीआर, लोकेशन जाणून घ्यायचे असेल तर तुम्ही सर्व काही तपासू शकता. हजारो लोक आशिष मिश्रा कार्यक्रमात होते, असा जबाब देण्यास तयार आहेत" असं अजय मिश्रा यांनी एनडीटीव्हीशी बोलताना म्हटलं आहे.
"सरकार आक्रमण करतंय, शेतकऱ्यांना जीपखाली चिरडलं जातंय; त्यांची हत्या केली जातेय"
"शेतकऱ्यांना जीपखाली चिरडले जातंय, पंतप्रधान लखनऊमध्ये होते पण ते लखीमपूर खिरी येथे गेले नाहीत" असं म्हणत राहुल यांनी निशाणा साधला होता. राहुल गांधी यांनी "काही दिवसांपासून देशातील शेतकऱ्यांवर सरकार आक्रमण करत आहे. शेतकऱ्यांना जीपखाली चिरडले जात आहे. त्यांची हत्या केली जात आहे. भाजपा नेत्याच्या मुलावर कोणतीही कारवाई केली गेली नाही. दुसरीकडे पद्धतशीरपणे शेतकऱ्यांवर हल्ले केले जात आहेत. पंतप्रधान लखनऊमध्ये होते पण लखीमपूर खिरी येथे गेले नाहीत. दोन मुख्यमंत्र्यांच्या बरोबर मी लखीमपूर खिरी येथे जाण्याचा प्रयत्न करणार आहे" असं म्हटलं होतं.