लखनौ - उत्तर प्रदेश सरकारने काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी आणि खासदार राहुल गांधी यांना लखीमपूरला जाण्याची परवानगी दिली होती. त्यानंतर, रात्री उशीर राहुल गांधी आणि प्रियंका यांनी पीडित कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. लवप्रीतने दिलेलं बलिदान कधीही विसरणा नाही, असे ट्विट राहुल गांधींनी केले आहे. तसेच, जोपर्यंत पीडित कुटुंबीयास न्याय मिळत नाही, तोपर्यंत हा सत्याग्रह चालूच राहिल, असा इशाराही राहुल गांधींनी दिला आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्याशिवाय आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांनाही लखीमपूरला जाण्याची परवानगी देण्यात आली होती. राहुल गांधी हे काही वेळापूर्वीच लखनौला जाण्यासाठी दिल्ली विमानतळावून निघाले होते. रात्री उशिरा राहुल गांधी लखीमपूरा येथे पोहोचले. यावेळी, दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या लवप्रीतच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.
पत्रकार परिषदेतून सरकारला हल्लाबोल
राहुल गांधी यांनी आज सकाळी पत्रकार परिषदेत लखीमपूर खेरीतील झालेल्या हिंसाचारावरून केंद्र सरकारवर थेट निशाणा साधला. "उत्तर प्रदेशमध्ये शेतकऱ्यांना मारले जात आहे. त्यांच्या सरकारमधील आमदारानेही बलात्कार केला होता. त्यामुळे उत्तर प्रदेशमध्ये नव्या प्रकारचे राजकारण होत आहे. बलात्कार, शेतकऱ्यांना मारणे सुरू आहे. जे मारतात ते जेलच्या बाहेर असतात आणि जे मरतात ते आतमध्ये जातात. पण, आम्हाला मारले, गाडले तरी काही फरक पडत नाही. आमचे ट्रेनिंगच तसे झाले आहे. हा शेतकऱ्यांचा मुद्दा आहे. त्यामुळे मी लखनऊला जाऊन सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न करणार," असे राहुल गांधी यांनी म्हटले होते.