lakhimpur Kheri : इकडे महाराष्ट्रात बंद, दिल्लीत राहुल अन् प्रियंका गांधी आक्रमक
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2021 09:02 PM2021-10-11T21:02:57+5:302021-10-11T21:04:34+5:30
काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी आणि राहुल गांधी यांनी दिलेल्या लढ्यामुळे उत्तर प्रदेश सरकारने नाईलाजाने का होईना सहा दिवसानंतर आरोपीला अटक केल्याचं नाना पटोले यांनी म्हटलं.
मुंबई - उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथील शेतकरी मृत्यू प्रकरणाचा निषेध करण्यासाठी व शेतकऱ्यांना न्याय देण्याच्या मागणीसाठी महाविकास आघाडीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला राज्यातील जनतेने व व्यापाऱ्यांनी प्रचंड प्रतिसाद दिला. राज्यभरात सर्वच जिल्ह्यांमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. तिकडे दिल्लीत काँग्रेस नेते राहुल गांधी आणि काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनीही मंत्री अजय मिश्रा टेनी यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली आज काँग्रेस नेत्यांनी राजभवनावर मौनव्रत आंदोलन केले. यावेळप्रसार माध्यमांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, आजचा बंद पूर्णपणे यशस्वी झाला आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये नागरिकांनी कडकडीत बंद पाळून शेतकऱ्यांचे मारेकरी भाजपाला सणसणीत चपराक लगावली आहे. बंदला विरोध करून भाजपाने आपला खरा शेतकरी विरोधी चेहरा दाखवून दिला आहे. त्यांच्या मंत्र्यांचा मुलगा गाडीखाली शेतकऱ्यांना चिरडून मारतो तरीही पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी यांचे ह्रदय द्रवले नाही. या घटनेतील गुन्हेगारांना वाचवण्यासाठी भाजपा आटापिटा करत आहे.
काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी आणि राहुल गांधी यांनी दिलेल्या लढ्यामुळे उत्तर प्रदेश सरकारने नाईलाजाने का होईना सहा दिवसानंतर आरोपीला अटक केल्याचं नाना पटोले यांनी म्हटलं. दरम्यान, राहुल गांधी यांनी आरोपीच्या अटकेनंतर आता केंद्रीयमंत्री अजय मिश्रा यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. यासंदर्भात राहुल गांधी आणि प्रियंका गांधींनीही ट्विट केले आहे. दरम्यान, अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा यास न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे, अजय मिश्रा यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत आहे.
इस मंत्री को बर्खास्त ना करके भाजपा न्याय की प्रक्रिया में बाधा डाल रही है।
— Rahul Gandhi (@RahulGandhi) October 11, 2021
केंद्र सरकार ना तो किसानों की परवाह करती है, ना ही हत्या के शिकार भाजपा कार्यकर्ताओं की।#KisanKoNyayDo
या मंत्र्याला बडतर्फ ने करता, भाजपा न्यायप्रक्रियेत अडथळा निर्माण करत आहे, केंद्र सरकारला ना शेतकऱ्यांची चिंता आहे, ना हत्याचे शिकार बनलेल्या भाजप कार्यकर्त्यांची, असे ट्विट राहुल गांधी यांनी केले आहे. किसान को न्याय दो... असा हॅशटॅगही त्यांनी चालवला आहे.
मंत्री का बेटा किसानों की हत्या के आरोप में गिरफ्तार
— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) October 11, 2021
क्या अब भी मंत्री को अपने पद पर बने रहने का है अधिकार?
निष्पक्ष जांच और न्याय के लिए केंद्रीय गृह मंत्री की बर्खास्तगी जरूरी है। @narendramodi जी अपने मंत्री को संरक्षण देना बंद करिए।#KisanKoNyayDopic.twitter.com/ihq30F3z4D
प्रियंका गांधी यांनीही ट्विट करुन, मंत्र्यांचा पोरगा शेतकऱ्याच्या मुलाच्या हत्याप्रकरणात अटकेत आहे. मग, अजूनही मंत्र्याला मंत्रीपदावर राहण्याचा अधिकार आहे का?, असा सवाल प्रियंका गांधी यांनी विचारला आहे. तसेच, नि:पक्ष न्याय आणि तपास होण्यासाठी केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांचा राजीनामा घ्यायला हवा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.