मुंबई - उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथील शेतकरी मृत्यू प्रकरणाचा निषेध करण्यासाठी व शेतकऱ्यांना न्याय देण्याच्या मागणीसाठी महाविकास आघाडीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला राज्यातील जनतेने व व्यापाऱ्यांनी प्रचंड प्रतिसाद दिला. राज्यभरात सर्वच जिल्ह्यांमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. तिकडे दिल्लीत काँग्रेस नेते राहुल गांधी आणि काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनीही मंत्री अजय मिश्रा टेनी यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली आज काँग्रेस नेत्यांनी राजभवनावर मौनव्रत आंदोलन केले. यावेळप्रसार माध्यमांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, आजचा बंद पूर्णपणे यशस्वी झाला आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये नागरिकांनी कडकडीत बंद पाळून शेतकऱ्यांचे मारेकरी भाजपाला सणसणीत चपराक लगावली आहे. बंदला विरोध करून भाजपाने आपला खरा शेतकरी विरोधी चेहरा दाखवून दिला आहे. त्यांच्या मंत्र्यांचा मुलगा गाडीखाली शेतकऱ्यांना चिरडून मारतो तरीही पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी यांचे ह्रदय द्रवले नाही. या घटनेतील गुन्हेगारांना वाचवण्यासाठी भाजपा आटापिटा करत आहे.
काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी आणि राहुल गांधी यांनी दिलेल्या लढ्यामुळे उत्तर प्रदेश सरकारने नाईलाजाने का होईना सहा दिवसानंतर आरोपीला अटक केल्याचं नाना पटोले यांनी म्हटलं. दरम्यान, राहुल गांधी यांनी आरोपीच्या अटकेनंतर आता केंद्रीयमंत्री अजय मिश्रा यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. यासंदर्भात राहुल गांधी आणि प्रियंका गांधींनीही ट्विट केले आहे. दरम्यान, अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा यास न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे, अजय मिश्रा यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत आहे.