नवी दिल्ली:भाजप खासदार वरुण गांधी(BJP MP Varun Gandhi) यांनी लखीमपूर येथे झालेल्या घटनेवरुन पक्षालाच घरचा आहेर दिला आहे. गुरुवारी त्यांनी ट्विटरवर लखीमपूर(Lakhimpur kheri) येथील एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात एक भरधाव गाडी शेतकऱ्यांना चिरडत जाताना दिसत आहे. हा व्हिडिओ पोस्ट करत त्यांनी निष्पाप शेतकऱ्यांच्या मृत्यूची जबाबदारी स्विकारण्याचे आवाहन केलं आहे.
रविवारी उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना(Farmer Protest) एका भरधाव गाडीने चिरडले होते. यात चार शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर झालेल्या हिंसाचारात काही भाजप कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला. त्या घटनेचा एक व्हिडिओही समोर आला होता, पण त्यात स्पष्टपणे दिसत नव्हते. पण, आता त्या घटनेचा स्पष्ट व्हिडिओ समोर आला आहे.
या नवीन व्हिडिओत एक भरधाव गाडी शेतकऱ्यांना चिरडत जाताना दिसत आहे. वरुण गांधींनी हाच व्हिडिओ आपल्या ट्विटरवर शेअर केला आहे. त्या व्हिडिओसोबत त्यांनी लिहीले, 'या व्हिडिओत एकदम स्पष्टपणे दिसत आहे. आंदोलकांना मारुन शांत केलं जाऊ शकत नाही. निरपराध शेतकऱ्यांच्या मृत्यूची जबाबदारी घ्यावी आणि शेतकऱ्यांमध्ये चुकीचा संदेश जाण्यापूर्वी त्यांना योग्य तो न्याय दिला जावा,' असं वरुण गांधी म्हणाले.
सरकारकडून चौकशी आयोग स्थापना
लखीमपूर खेरी हिंसा प्रकरणाच्या चौकशीसाठी राज्य सरकारने एक सदस्यीय चौकशी आयोगाची स्थापना केली आहे. याची जबाबदारी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीशांवर सोपवण्यात आली आहे. त्यांना दोन महिन्यांत तपास पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.