नितीन अग्रवालनवी दिल्ली : लखीमपूर येथे रविवारी चार शेतकऱ्यांसह आठ जणांचा मृत्यू झाल्यामुळे उत्तर प्रदेशमध्ये भाजपच्या अडचणी वाढल्या आहेत. शेतकरी आंदोलनामुळे पश्चिम उत्तर प्रदेश आधीच भाजपसाठी आव्हान बनला आहे. चार महिन्यांनंतर राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे राजकीय गणित बिघडू शकते.
राज्यातील राजकारणाचे निरीक्षक वरिष्ठ पत्रकार सिद्धार्थ कलहंस यांच्या म्हणण्यानुसार लखीमपूर खीरी घटनेत थेटपणे भाजपच्या केंद्रीय मंत्र्याचे नाव जोडले जात आहे. पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये शेतकरी आधीच नाराज होते. भाजप या घटनेनंतर बॅकफूटवर असून पक्षाच्या एका प्रमुख प्रवक्त्याने काहीही भाष्य करण्यास नकार देत म्हटले की, या प्रकरणी उत्तर प्रदेश शाखा बोलेल. राज्यातील भाजपच्या सह निवडणूक प्रभारी सरोज पांडे यांनी काँग्रेस आणि विशेषत: काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्यावर टीका केली. गांधी यांनी केलेल्या आरोपांवर त्यांनी विचारले की, “तुम्ही मृतदेहांचे राजकारण करणे कधी सोडणार आहात?’’
सोशल मीडियात समाेरासमोरभाजपने भलेही या घटनेवरून मौन धारण केले तरी सोशल मीडियात लखीमपूर घटनेवरून भाजप आणि विरोधी पक्षाचे समर्थक सोमवारी एकमेकांसमोर आले होते. प्रत्येक घटनेवर ट्वीट करणाऱ्या भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी लखीमपूर घटनेवर काहीही ट्वीट केले नाही.