नवी दिल्ली - लखीमपूरमध्ये झालेल्या हिंसाचारात (Lakhimpur Kheri Violence) आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय गृह राज्य मंत्री अजय मिश्रा टेनी यांच्या मुलाला पोलिसांनी अटक केली आहे. त्याला अनेक प्रश्नांची उत्तरे देता आली नाहीत, तसेच चौकशीला तो सहकार्य़ करत नसल्याचे पोलिसांनी सांगितले. आशिष मिश्राची (Ashish Mishra) 12 तास चौकशी करण्यात आली. यानंतर राजकीय वातावरण तापलं आहे. याच दरम्यान केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन (Nirmala Sitharaman) यांनी यावर भाष्य करत आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. तसेच शेतकऱ्यांची हत्या होणं निंदनीय आहे असं म्हटलं आहे.
निर्मला सीतारमन यांनी "शेतकऱ्यांची हत्या होणं निंदनीय आहे, मात्र अशा प्रकारचे अनेक मुद्दे देशातील इतर भागातही असून वेळीच उपस्थित करत त्यांच्यावरही समान पद्धतीने भाष्य केलं पाहिजे" असं म्हटलं आहे. घटना घडतील तेव्हा त्या उपस्थित केल्या पाहिजेत असं सांगताना फक्त तिथे भाजपाचं सरकार आहे म्हणून जेव्हा योग्य वाटेल तेव्हा नाही असं सांगत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. निर्मला सीतारमन सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर असून हार्वर्ड केनेडी स्कूलमध्ये त्यांनी संवाद साधला. यावेळी त्यांना लखीमपूर खेरी येथील शेतकरी हत्या आणि केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा यांच्या अटकेसंबंधी विचारण्यात आलं.
"आमच्यातील प्रत्येकाचं हेच मत"
पंतप्रधान नरेंद्र मोदी तसंच इतर वरिष्ठ नेत्यांकडून लखीमपूर हिंसाचारावर मौन का बाळगलं आहे? तसंच कोणी अशा घटनांबद्दल प्रश्न विचारल्यानतंर बचावात्मक प्रतिक्रिया का दिली जाते? असं विचारण्यात आलं. यावर उत्तर देताना त्यांनी "नाही…नक्कीच नाही. बरं झालं तुम्ही अशा एका घटनेचा उल्लेख केलात जी निषेधार्ह आहे. आमच्यातील प्रत्येकाचं हेच मत आहे. अशा प्रकारच्या घटना इतर ठिकाणीही घडत असून तो माझ्या काळजीचा विषय आहे" असं म्हटलं आहे.
"संपूर्ण प्रकरणाची चौकशी करुनच न्याय दिला जाईल"
"भारतातील अनेक भागांमध्ये अशा प्रकारच्या वेगवेगळ्या घटना घडत आहेत. माझी डॉक्टर अमर्त्य सेन यांच्यासह सर्वांना विनंती आहे की, जेव्हा कधी अशा घटना घडतील तेव्हा त्यांच्यावर भाष्य करुन मुद्दा मांडा. फक्त भाजपाशासित राज्यांमध्ये घडलं असेल तेव्हाच योग्य संधी म्हणून तो मांडला जाऊ नये. माझ्या कॅबिनेट सहकाऱ्याचा मुलगा कदाचित अडचणीत आहे, आणि असे गृहीत धरू की प्रत्यक्षात त्यांनीच हे केले आहे आणि इतर कोणी नाही. पण संपूर्ण प्रकरणाची चौकशी करुनच न्याय दिला जाईल" असं निर्मला सीतारमन यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.