भुवनेश्वर: काही दिवसांपूर्वी शेतकऱ्यांना चिरडल्याच्या प्रकरणांपासून चर्चेत आलेले केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा रविवारी ओडिशात पोहोचले असता, त्यांना प्रचंड विरोधाचा सामना करावा लागला. ओडिशात दाखल झालेले गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांना विमानतळाबाहेर येताच काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांना काळे झेंडे दाखवले आणि त्यांच्या गाडीवर अंडीही फेकली.
मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी रविवारी ओडिशाची राजधानी भुवनेश्वर येथे पोहोचले होते. अजय मिश्रा टेनी यांचा ताफा भुवनेश्वरच्या बिजू पटनायक आंतरराष्ट्रीय विमानतळावरून बाहेर पडताच काँग्रेस कार्यकर्ते काळे झेंडे घेऊन रस्त्यावर आले. काँग्रेस कार्यकर्त्यांनी अजय मिश्रा यांना काळे झेंडे तर दाखवलेच, पण त्यांच्या गाडीवर अंडीही फेकली. 3 ऑक्टोबर रोजी शेतकऱ्यांना चिरडल्याचे प्रकरण झाले, त्या निषेधार्थ काँग्रेस कार्यकर्त्यांनी अजय मिश्रा टेनी यांचा जोरदार विरोध केला.
लखीमपूर खेरीत काय घटलं ?3 ऑक्टोबर रोजी उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे कथितरित्या अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्राने चार शेतकर्यांना चिरडल्याची घटना घडली. त्यानंतर उसळलेल्या हिंसाचारात एका पत्रकारासह आणखी चार जणांचा मृत्यू झाला होता. यानंतर बऱ्याच दिवस बेपत्ता राहिल्यानंतर त्याने पोलिसांना आत्मसमर्पण केले. त्या घटनेच्या विरोधात देशभरात शेतकऱ्यांनी विविध ठिकाणी आंदोलने केली. तसेच, अजय मिश्रा यांच्या राजीनाम्याची मागणीही शेतकरी संघटना आणि विरोधी पक्षाकडून करण्यात आली.