नवी दिल्ली : लखीमपूर खेरीमध्ये शेतकऱ्यांवर गाडी चढवणे, हा पूर्वनियोजित कटाचा भाग होता. विशेष तपास पथकाने (SIT) ही माहिती दिली आहे. या प्रकरणात केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा मुख्य आरोपी आहे. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिस पथकाने आशिष मिश्रा यांच्यावरील आरोपांमध्ये सुधारणा करण्यात यावी, असे पत्र न्यायाधीशांना लिहिले आहे. आशिष मिश्रा आणि इतरांवर यापूर्वीच खून आणि कट रचण्याचे आरोप आहेत. त्यात खुनाचा प्रयत्न आणि इतर आरोपही जोडले जावेत, अशी विशेष तपास पथकाची इच्छा आहे.
सत्ताधारी भाजप यूपीमध्ये विधानसभा निवडणुकीच्या तयारीत असताना, केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांच्यासाठी या घडामोडी मोठी डोकेदुखी ठरू शकतात. या घटनेनंतर विरोधकांकडून अजय मिश्रा यांना हटवण्याची मागणी सातत्याने होत असतानाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना मंत्रिमंडळात कायम ठेवले आहे. लखीमपूर खेरीच्या घटनेबाबत शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप असून, त्याचा परिणाम येत्या निवडणुकीत दिसून येऊ शकतो.
त्या दिवशी काय घडले ?3 ऑक्टोबर रोजी लखीमपूर खेरी येथे शेतकरी आंदोलनादरम्यान झालेल्या या घटनेत चार शेतकऱ्यांसह आठ जणांचा मृत्यू झाला होता. आशिष मिश्रा यांच्या एसयूव्हीने शेतकर्यांना चिरडले होते, या घटनेचा व्हिडिओही व्हायरल झाला होता. त्यानंतर हिंसाचार उसळला आणि आणखी चार जणांना आपला जीव गमवावा लागला. या घटनेनंतर शेतकऱ्यांनी दाखल केलेल्या एफआयआरमध्ये आशिष मिश्राचे नाव आहे.
सदोष मनुष्यवधाच्या जागी खुनाचे कलम जोडले जाईलकेंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रासह 14 आरोपींविरुद्ध कलम 279, 338, 304अ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासानंतर एसआयटीने हा सुनियोजित कट असल्याचे म्हटले आहे. आता तपास यंत्रणेने कलम 307, 326, 302, 34, 120B, 147,148,149,3/25/30 अन्वये खटला चालवण्यासाठी न्यायालयात अर्ज केला आहे.