कानपूर - उत्तर प्रदेशातील लखीमपूर खीरी (Lakhimpur Kheri) येथे आंदोलक शेतकऱ्यांवर गाडी घातल्याप्रकरणी केंद्रीय गृह राज्य मंत्री अजय मिश्रा टेनी यांच्या मुलाला पोलिसांनी रात्री उशिरा अटक केली आहे. त्याला अनेक प्रश्नांची उत्तरे देता आली नाहीत, तसेच चौकशीला तो सहकार्य़ करत नसल्याचे पोलिसांनी सांगितले. (Ashish Mishra arrested) आशिष मिश्राला अटक केल्यामुळे येथील आंदोलकांचा संताप काही प्रमाणात कमी झाला आहे. मात्र, भाजपा नेते वरुण गांधी यांनी याप्रकरणावरुन गंभीर आरोप केला आहे.
वरुण गांधी मागील काही काळापासून सरकारच्या धोरणांविरोधात आणि आता नुकत्याच झालेल्या लखीमपूरच्या घटनेवरुन केंद्र सरकारवर टीका करत आहेत. तसेच, काही दिवसांपूर्वी त्यांनी आपल्या ट्विटर बायोमधून भाजपचे नावही हटवले आहे. त्यांच्या याच टीकेचा फटका त्यांना बसला आहे. खासदार वरुण गांधी आणि त्यांच्या आई मनेका गांधी यांना भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतून बाहेर ठेवण्यात आलं आहे. मात्र, त्यांनी शेतकऱ्यांसोबतची भूमिका कायम ठेवली आहे. लखीमपूर खेरी घटनेवरुन ते सातत्याने सरकारला लक्ष्य करत आहेत.
वरुण गांधी यांनी पुन्हा एकदा ट्विट करुन लखीमपूर खेरी येथील घटनेला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न होत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. 'लखीमपूर खेरी प्रकरणातून हिंदू विरुद्ध शीख असा धार्मिक वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. हे विधान अनैतिक किंवा खोटं आहे असे नाही. एका पिढीला बरं करण्यासाठी लागलेल्या जखमा पुन्हा ताज्या करणं, तसेच दोष-रेषा निर्माण करणं हे धोकादायक आहे,' असे वरुण गांधी यांनी म्हटलं आहे. तसेच, आपल्या क्षुल्लक राजकीय लाभासाठी राष्ट्रीय एकतेला धोका पोहोचवू नये, असेही वरुण यांनी आपल्या ट्विटमधून म्हटले आहे.
आशिष मिश्राची 12 तास चौकशी
पोलिसांकडून आशिष मिश्राची (Ashish Mishra) १२ तास चौकशी करण्यात आली. गेल्या काही दिवसांपासून पसार असलेला आशिष मिश्रा आज सकाळी 10 वाजता सहारनपूर पोलीस ठाण्यात हजर झाला. बाईकवरून त्याला एका आमदाराने पोलीस ठाण्यात आणले. त्यानंतर त्याची 12 तास चौकशी सुरु होती. या काळात त्याला 40 हून अधिक प्रश्न विचारण्यात आले. त्यामध्ये शेतकऱ्यांवर गाडी चढविताना तो कुठे होता, हे देखील विचारण्यात आले. यावर तो तेव्हा कुठे होता हे पुराव्यानिशी सांगू शकला नाही.