लखनऊ : उत्तर प्रदेशातील बनवीरपूर गावामध्ये ३ ऑक्टोबर रोजी कुस्तीच्या सामन्यांच्या जागी केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांचा पुत्र आशिष उपस्थित होता का, याविषयी तेथील गावकरी दहशतीमुळे कोणाशीही फारसे काही बोलायला तयार नाहीत. त्या दिवशी लखीमपूर खेरी येथे हिंसाचारात शेतकऱ्यांसह आठ जण ठार झाले. त्या घटनास्थळी आशिष मिश्रा उपस्थित होता का, याबद्दलही गावकरी काही सांगायला तयार नाहीत. बनवीरपूर हे केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांचे गाव आहे.केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा बनवीरपूर गावामध्ये दरवर्षी २ ऑक्टोबरला कुस्तींच्या सामन्यांचे आयोजन करतात. यंदा ३ ऑक्टोबरला सकाळी दहा वाजल्यापासून हे सामने भरविण्यात आले. उपमुख्यमंत्री केशव मौर्य त्या दिवशी दुपारी सव्वा दोनला बनवीरपूरला अजय मिश्रा यांच्या घरी जाणार होते. त्यानंतर कुस्तीच्या सामन्यांच्या ठिकाणी रवाना होणार होते. लखीमपूर खेरी हिंसाचाराबाबत काही व्हिडिओ समाजमाध्यमांवर झळकले असले तरी या घटनेनंतर इंटरनेट बंद करण्यात आल्याने आम्ही ते पाहिलेच नाहीत, असेही काही गावकरी म्हणाले. बनवीरपूर येथील ज्या प्राथमिक शाळेत कुस्त्यांचे सामने आयोजिण्यात आले होते, तेथील काही विद्यार्थ्यांनी मात्र ठामपणे सांगितले की, आशिष मिश्रा कुस्त्यांच्या ठिकाणी दिवसभर हजर होता. (वृत्तसंस्था)
...पण पुरावे नाहीतकुस्त्यांचे सामने संध्याकाळपर्यंत सुरू होते. त्यामुळे आपण त्याच ठिकाणी होतो, असा दावा आशिष मिश्रा याने पोलिसांकडे केला होता. पण त्याचे पुरावे तो देऊ शकला नाही. लखीमपूर खेरीतील तिकुनिया येथे हिंसाचार झाला, त्यावेळी आशिष मिश्रा नेमका कुठे होता याबद्दल बनवीरपूर गावामध्ये कोणीच माहिती द्यायला तयार होत नाही.