लखनौ - लखीमपूर खिरी येथे झालेल्या हिंसाचार प्रकरणामध्ये केंद्रीय मंत्री अजय मिश्रा टेनी यांचा मुलगा आशिष मिश्रा याच्या विरोधात उत्तर प्रदेश पोलिसांना पुरावे मिळाले आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार उत्तर प्रदेश पोलिसांना आशिष मिश्रा उर्फ मोनू याच्याविरोधात पुरावे मिळाले आहेत. (Lakhimpur Khiri violence case)आशिष मिश्रा ही हिंसाचाराची घटना घडली तेव्हा आशिष मिश्रा अंकित दास याच्या फॉर्च्युनर कारमध्ये होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांना आशिष मिश्रा घटनास्थळावर उपस्थित असल्याचे पुरावे मिळाले आहेत. त्यानंतर आशिष मिश्रा आणि अंकित या दोघांचाही शोध घेतला जात आहे. तर तिकोनिया हिंसाचारातील मुख्य आरोपी असलेला आशिष मिश्रा शुक्रवारी सकाळी १० वाजेपर्यंत क्राईम ब्रँचसमोर हजर झालेला नाही. पोलिसांनी आशिष मिश्राच्या घरावर क्राईम ब्रँचच्या समोर हजर होण्यासाठी त्याच्या घरावर नोटीस चिकटवली होती. आता पोलीस आशिष मिश्राला फरार घोषित करण्याची शक्यता आहे. तसेच आशिषच्या अटकेसाठी त्याच्या संभाव्य ठिकाणांवर छापा घालू शकते. (Union Minister's son Ashish Mishra in trouble, police get evidence)
लखीमपूर खीरी हिंसाचार प्रकरणातील मुख्य आरोपीला यूपी पोलिसांनी आज म्हणजेच शुक्रवारी चौकशीसाठी बोलावले होते. मात्र निर्धारित वेळेपर्यंत आशिष पोहोचला नाही. आता पोलिसांनी आशिषचे लोकेशन ट्रेस करण्यास सुरुवात केली आहे. गुरुवारी त्याचे लोकेशन नेपाळ बॉर्डरजवळ दिसत होते. दरम्यान, आज त्याचे लोकेशन उत्तराखंडमध्ये दाखवले जात आहे. आता या प्रकरणात उत्तर प्रदेश पोलीस उत्तराखंड पोलिसांचीही मदत घेत आहेत.
लखीमपूर खीरी प्रकरणात उत्तर प्रदेश सरकार सुप्रीम कोर्टामध्ये सरन्यायाधीश एनव्ही रमण्णा यांच्या पीठासमोर स्टेटस रिपोर्ट सादर करणार आहे. सरकारकडून आतापर्यंत उचलण्यात आलेल्या सर्व पावलांचा रिपोर्टमध्ये उल्लेख करण्यात येणार आहे. उत्तर प्रदेश सरकारकडून पीडितांना देण्यात आलेल्या मोबदल्याचा आणि आयोगाच्या स्थापनेसह सर्व पावलांची माहिती सरकारकडून कोर्टाला दिली जाईल. सर्व मृत पीडितांची नावे आणि आरोपींचे नाव तसेच एफआयआरचा उल्लेख असेल. उत्तर प्रदेश सरकार पोलिसांचा तपास आणि आरोपींच्या अटकेबाबतही स्थिती स्पष्ट करणार आहे.
उत्तर प्रदेश सरकारमधील कायदेमंत्री बृजेश पाठक यांनी सांगितले की, लखीमपूर प्रकरणापासून सरकार सातत्याने कारवाई करत आहे. दोषींना सोडले जाणार नाही. फेब्रुवारी-मार्च महिन्यात उत्तर प्रदेशमध्ये निवडणुका आहेत. त्यामुळे राजकीय पक्ष सहानुभूती मिळवण्यासाटी संपूर्ण प्रकरणावर राजकारण करत आहेत. आशिष मिश्रा हे गैरहजर राहिल्याबाबत आमच्या सरकारचे म्हणणे आहे की, दोषी हा दोषी आहे. त्याच्यामध्ये कुणी मोठा लहान, श्रीमंत गरीब नाही आहे. जो दोषी असेल त्याच्यावर कारवाई केली जाईल.