नवी दिल्ली - वादग्रस्त केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात गेल्या १० महिन्यांपासून शेतकऱ्यांचे दिल्लीतील सीमांवर आंदोलन सुरू आहे. त्यानंतर आता उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खिरी जिल्ह्यात शेतकरी आंदोलनात वाहन शिरल्याने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे, तर काही शेतकरी जखमी झाले आहेत. त्यामुळे, येथील शेतकऱ्यांच्या भेटीसाठी निघालेल्या प्रियंका गांधींना पोलिसांनी अटक केल्याचे माहिती युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास बी.व्ही यांनी ट्विटरवरुन दिली आहे.
केंद्रातील मोदी सरकार आणि आंदोलक शेतकरी नेते आपापल्या भूमिकांवर ठाम असल्यामुळे अद्याप यावर तोडगा निघालेला नाही. अलीकडेच शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंदला उत्तरेतील राज्यांत सकारात्मक प्रतिसाद मिळाला. आता, युपीतील लखीमपूर येथील शेतकरी आक्रमक झाल्याचं दिसून येत आहे. आंदोलन थोपवता आले नाही, म्हणून आता शेतकऱ्यांनाच चिरडून टाकले. या नरसंहारावर जी लोक मूग गिळून गप्प बसलीत, त्यांनी या कालचक्राचा फेरा कायम स्मरणात ठेवावा, त्यांनाही अशाच प्रकारे एक दिवस निशाण्यावर घेतले जाईल. या प्रकरणाला सरळपणे पंतप्रधान मोदी आणि उत्तर प्रदेशचे गृह राज्यमंत्री अजय मिश्र टोनी जबाबदार आहेत, या शब्दांत युथ काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास बी. वी. यांनी हल्लाबोल केला.
आम आदमी पक्षाचाही हल्लाबोल
या प्रकारानंतर आम आदमी पक्षाचे नेते संजय सिंह यांनी केंद्रातील मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. सत्तेची अशी नशा, धुंदी आजपर्यंत कुणी पाहिली नसेल किंवा ऐकीवात नसेल. आंदोलक शेतकऱ्यांवर मंत्र्याच्या मुलाने कार चढवली. यामध्ये तीन आंदोलक शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. आणखी किती शेतकऱ्यांचे जीव घेणार आहात PM मोदीजी. गुन्हेगारांना अटक करून सीबीआयच्या माध्यमातून चौकशी करण्यात यावी. कुटुंबांना नुकसानभरपाई द्या, अशी मागणी सिंह यांनी ट्विटरच्या माध्यमातून केली आहे.