लखीमपूर: उत्तर प्रदेशातील लखीमपूरमध्ये झालेल्या हिंसाचाराचे व्हिडीओ समोर येऊ लागले आहेत. शेतकऱ्यांना धडक देणाऱ्या थारला रोखून काही जण पळत असल्याचं एका व्हिडीओतून समोर आलं आहे. थारच्या मागच्या चाकाजवळ एक जखमी व्यक्ती पडलेला आहे. कारच्या आसपास गोंधळ असून लोकांची पळापळ सुरू आहे.
शेतकऱ्यांना चिरडणाऱ्या थारचा व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे. थारमधील दोन व्यक्ती शेतकऱ्यांना चिरडून कारमधून पळत असताना व्हिडीओत दिसत आहेत. शेतकऱ्यांनी केंद्रीय राज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रावर आरोप केले आहेत. आशिष मिश्रानं शेतकऱ्यांना चिरडल्याचा आरोप केला आहे. तर घटना घडली त्यावेळी आपण वेगळ्या कार्यक्रमात होतो, असा दावा मिश्रानं केला आहे.
याआधी लखमीपूरमधील घटनेचा एक व्हिडीओ समोर आला होता. आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांनी हा व्हिडीओ ट्विट केला होता. या व्हिडीओमध्ये एक कार शेतकऱ्यांना चिरडताना दिसत आहे. आपचे नेते संजय सिंह यांनी हा व्हिडीओ रिट्विट केला. यामध्ये एक कार हाती झेंडे घेऊन जात असलेल्या शेतकऱ्यांना मागून धडक देत असल्याचं दिसत आहे.