नवी दिल्ली - बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे. मात्र प्रचारासाठी गेलेल्या एका मंत्र्याला लोकांच्या रोषाचा सामना करावा लागला आहे. मतं मागण्यासाठी आलेल्या बिहारच्या कामगार संसाधन मंत्र्याला ग्रामस्थांनी घेरल्याची घटना समोर आली आहे. मुर्दाबादच्या घोषणा देत ग्रामस्थांनी मंत्र्याचा निषेध सुरू केला. तसेच जमलेल्या लोकांनी मंत्र्यावर शेण फेकायला सुरुवात केली आणि जोरदार घोषणाबाजी केली आहे.
ग्रामस्थांनी केलेला विरोध आणि व्यक्त केलेला संताप पाहून मंत्री आल्या पावली पळून गेले आहेत. सोशल मीडियावर मंत्र्यांवर शेण फेकतानाचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लखीसराय विधानसभा मतदारसंघात भाजपाचे उमेदवार आणि बिहार सरकारचे कामगार संसाधन मंत्री विजयकुमार सिन्हा यांनी निवडणूक प्रचाराला सुरुवात केली आहे. विजयकुमार सिन्हा हे हलसीच्या तरहारी गावात मतं मागण्यासाठी गेले होते. मात्र गावात प्रवेश करताच सिन्हा यांच्या विरोधात ग्रामस्थांनी घोषणा देण्यास सुरुवात केली.
संतप्त गावकऱ्यांनी मुर्दाबादच्या दिल्या घोषणा
संतप्त झालेल्या लोकांनी मुर्दाबादच्या घोषणा देत सिन्हा यांना गावातून निघून जाण्यास सांगितलं. लोकांना शांत करण्याचा सिन्हा यांनी प्रयत्न केला. मात्र अचानक लोक त्यांच्यावर शेण फेकू लागले. यानंतर सिन्हा गावात थांबले नाहीत. ते आल्या पावली निघून गेले. विजयकुमार सिन्हा यांनी काहीही काम केलेलं नाही असं असताना हे मंत्री महाशय कोणत्या तोंडाने मतं मागण्यासाठी आले असा प्रश्न लोकांनी उपस्थित केला आहे. तर सिन्हा यांनी हा विरोधकांचा कट असल्याचा आरोप केला आहे.
सिन्हा यांनी विरोधकांचा कट असल्याचा केला आरोप
विजयकुमार सिन्हा यांनी "अशा प्रकारची कृत्ये असामाजिक तत्व करत असतात. त्यासाठी ते अशी योजना आखतात. मात्र जनता आमच्या सोबत आहे. जनता एनडीएची विकासकामे पाहत आहे. याच कारणामुळे विरोधक घाबरले आहेत" असं म्हटलं आहे. तसेच आज ज्या गावात विरोध दर्शवला जात आहे, त्या गावात मी सहा रस्ते बनवले आहेत. तरहारी गावातील 95 टक्के लोक आमच्या सोबत आहेत. केवळ 5 टक्केच लोक अशा प्रकारची कामे करत आहेत असं देखील त्यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.