ऑनलाइन लोकमत
हैदराबाद, दि. १८ - 'लेडीज व्हर्सेस रिकी बहल' या चित्रपटातील कथानकाला साजेसी एक घटना हैदराबादमध्ये उघडकीस आली आहे. ख-याखु-या आयुष्यातील या रिकी बहलचे नाव आहे वेंकट रत्ना रेड्डी. चित्रपटात रणवीर लग्नाचे आमिष दाखवून तरुणींची फसवणूक करायचा. इथे मात्र वेंकट तरुणींशी लग्न करुन नंतर त्यांची फसवणूक करायचा.
ख-या आयुष्यातील या रिकी बहलचा प्रवास अखेर तुरुंगात जाऊन थांबला. हैदराबाद गुन्हे शाखेने महिलांची फसवणूक करणा-या वेंकटला अखेर अटक केली. विवाह जुळवणा-या लोकप्रिय मॅट्रीमोनियल साईटसवरुन तो महिलांशी संर्पक साधायचा. अमेरिकेतील
एका कुटुंबाच्या तक्रारीवरुन पोलिसांनी त्याला आंध्रप्रदेशच्या गुटुंर जिल्ह्यातून अटक केली.
तेलंगणमधील फसवणूकीच्या नऊ प्रकरणांमध्ये पोलिस वेंकटच्या मागावर होते. रेड्डीकडे विशाखापट्टणम ते अमेरिका प्रवासाचा बिझनेस व्हिसा होता. अमेरिकेत गेल्यानंतर रेड्डी मॅट्रीमोनियल साईटवर त्याचे नवीन प्रोफाईल उघडायचा आणि सावज हेरायला सुरुवात करायचा. त्याने एका भारतीय वंशाच्या एनआरआय मुलीबरोबर लग्न केले आणि वीस दिवसांमध्ये तिला २० लाख रुपयांना फसवले.
या कुटुंबाने रेड्डी विरोधात हैदराबाद पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी इलेक्ट्रॉनिक सर्विलियन्सच्या माध्यमातून वेंकट रेड्डीवर पाळत ठेऊन त्याला अखेर अटक केली. पोलिसांनी रेड्डीचे सोशल नेटवर्कींग साईटवरील प्रोफाईल तपासले. त्यावर त्याची ३५० मुलींबरोबर प्रेम प्रकरणे सुरु असल्याची माहिती समोर आली. साधे पदवीपर्यंतचे शिक्षणही पूर्ण न केलेल्या वेकंटचे इंग्रजी भाषेवर प्रभुत्व होते. त्याचाच फायदा घेऊन तो महिलांना फसवायचा.