- सुरेश भटेवरानवी दिल्ली : जनतेला मोदी सरकारने धोका दिला असून, केवळ 0.१ टक्का लोकांसाठी काम करणारे सरकार देशात चालू देणार नाही. मोदी सरकार जाईल, तेव्हाच लोकांना अच्छे दिन तेव्हाच येतील. आयुष्य वाचविण्यासाठी मोदी सरकार हटविणे हाच उपाय आहे, असे उद्गार माकपचे महासचिव सीताराम येचुरी यांनी बुधवारी दिल्लीत लाखो शेतकरी व कामगारांच्या मोर्चासमोर काढले.अ. भा. किसान महासभा, सिटू, अ.भा. शेतमजूर संघटना या डाव्या संघटनांच्या नेतृत्वाखाली लाखो शेतकरी व कामगारांनी दिल्लीत मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. रामलीला मैदानापासून सुरू झालेल्या विशाल मोर्चात तीन लाखांहून अधिक शेतकरी व कामगार घोषणा देत होते. विविध राज्यांतील शेतकरी व कामगारांबरोबर पूरग्रस्त केरळचे शेतकरीही त्यात होते. लाल सलाम, लाल झेंडे, लाल टोप्या, लाल शर्टस व लाल साड्यांनी सजलेल्या या मोर्च्यामुळे दिल्लीत लाल रंगाचे दर्शन सर्वांना घडले. मोर्च्यामुळे दिल्लीची वाहतूक पार विस्कळीत झाली होती.शेतकरी व कामगारांच्या हाती मागण्यांचे पत्रक होते. घोषणाही तशाच होत्या. महागाई रोखा, सर्वांना रेशनचे स्वस्त धान्य पुरवा, स्वामीनाथन शिफारशीनुसार शेतकऱ्यांना हमीभाव द्या, शेतकरी व शेतमजुरांचे कर्ज माफ करा, बेरोजगारांना रोजगार द्या. शहरांमधे रोजगार हमी लागू करा. दरमहा किमान १८ हजार वेतन द्या, बळजबरीने भू संपादन बंद करा अशा त्या मागण्या आहेत. सिटूच्या कॉम्रेड हेमलता, खा. तपन सेन, किसान सभेचे अशोक ढवळे, हन्नन मौला, शेतमजूर युनियनचे ए.विजय राघवन आदी नेत्यांचीही भाषणे झाली. मोदी सरकारने जाहिरातबाजीवर जितका खर्च केला, तितका शेतकºयांच्या कल्याणासाठी खर्च केला असता तर देशात अशी स्थिती निर्माण झाली नसती, अशी टीका त्यांनी केली.नोव्हेंबरात राजधानीला घेराव घालणारअन्य वक्ते म्हणाले की, आमच्या मागण्या सरकारने मान्य न केल्यास लवकरच राजधानीत याहून मोठे आंदोलन केले जाईल. सर्व कामगार संघटनांची दिल्लीत संयुक्त परिषद २८ सप्टेंबर रोजी होईल. त्यानंतर, २८, २९, ३0 नोव्हेंबरला प्रत्येक राज्यातील लाखो शेतकरी व कामगार रस्त्यांवर उतरून दिल्लीला घेराव घालतील.
लाखो शेतकरी व कामगारांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; राजधानीत वाहतुकीची प्रचंड कोंडी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 06, 2018 3:55 AM