नवी दिल्ली : येथील रामलीला मैदानात आज, सोमवारी (दि. २०) रोजी होणाऱ्या किसान महापंचायतीमध्ये सहभागी होण्यासाठी देशभरातून लाखो शेतकऱ्यांनी दिल्लीकडे कूच केले आहे, असा दावा संयुक्त किसान मोर्चा या संघटनेने केला आहे.
शेती उत्पादनांच्या किमान आधारभूत किमतीबाबत (एमएसपी) कायदा करावा या व अन्य मागण्यांच्या पूर्ततेसाठी केंद्र सरकारवर दबाव वाढविण्याकरिता किसान महापंचायतीचे आयोजन करण्यात आले आहे. यासंदर्भात संयुक्त किसान मोर्चाचे नेते दर्शन पाल यांनी सांगितले की, शेतकऱ्यांना ९ डिसेंबर २०२१ रोजी दिलेली लेखी आश्वासने केंद्र सरकारने पूर्ण केली पाहिजेत. शेतकऱ्यांच्या समोर अनेक समस्या असून, त्यांच्या निवारणासाठी सरकारने पावले उचलावीत.
तीन कृषी कायद्यांच्या विरोधात संयुक्त किसान मोर्चाने शेतकऱ्यांच्या आंदोलनाचे नेतृत्व केले होते. सरकारविरोधात केलेल्या आंदोलनात शेतकऱ्यांवर दाखल झालेले खटले मागे घ्यावेत, तसेच एमएसपीची गॅरंटी आदी प्रलंबित मागण्यांवर विचार केला जाईल असे केंद्र सरकारने आश्वासन दिल्यानंतर आपले आंदोलन मागे घेतले होते.