ऑनलाइन लोकमत
चेन्नई, दि. 14 - मुख्यमंत्रीपद मिळवण्यासाठी आमदारांना ताब्यात घेणा-या व्ही.के.शशिकला यांनी आमदारांना चेन्नईच्या ज्या आलिशान गोल्डन बे बीच रिसॉर्टमध्ये ठेवले आहे. त्या रिसॉर्टमधल्या महागडया दर पत्रकाची माहिती समोर आली आहे. या रिसॉर्ट तीन वेगवेगळया प्रकारच्या 60 रुम्स आहेत. 5,500, 6,600 आणि 9,900 असे प्रत्येक दिवसाचे एका रुमचे भाडे आहे.
शशिकला कॅम्पने संपूर्ण रिसॉर्ट बुक केल्याचे गृहित धरल्यास आतापर्यंत सहादिवसांचे फक्त निवासाचे भाडे 25 लाखाच्या आसपास पोहोचते. बुधवारी रात्री अण्णाद्रमुकची बैठक पार पाडल्यापासून हे सर्व आमदार रिसॉर्टमध्ये मुक्कामाला आहेत. 100 आमदार आणि अन्य 100 असे मिळून एकूण 200 जण या रिसॉर्टमध्ये रहात आहेत.
निवासाच्या भाडयामध्ये अन्न, पाणी, नाष्टा, फळे आणि मद्य यांचा समावेश केलेला नाही. आमदारांना खूष ठेवण्यासाठी दररोज रात्री मनोरंजनाचे कार्यक्रम इथे होतात असे सूत्रांनी सांगितले. इथे रहाणा-या 200 जणांपैकी प्रत्येक जण दरदिवसाचे खाण्या-पिण्याचे बिल 2 हजार रुपये करत असेल तर, सहा दिवसांचे बिल 25 लाखांच्या घरात जाते. रिसॉर्टमध्ये राहणा-या प्रत्येकाला नवीन कपडे देण्यात आले आहेत.
आवश्यक सुविधांबरोबर रिसॉर्टमध्ये 24 तास रुम सर्विस, प्रशस्त खोल्या आहेत. शशिकला आणि पनीरसेल्वम यांच्यात सुरु असलेल्या लढाईत मुख्यमंत्री पनीरसेल्वम यांनी मला पक्षाच्या खजिनदारपदावरुन हटवता येणार नाही असे म्हटले आहे. त्यांनी बँकांना पत्र लिहून अण्णाद्रमुकची खाती गोठवण्याचे आदेश दिले आहेत.