देशातील ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या निकालाकडे देशाचे लक्ष लागले होते. या निकालात भाजपाने बाजी मारली असून ५ पैकी ३ राज्यांत स्पष्ट बहुमत मिळवण्यात भाजपला यश आलं आहे. मध्य प्रदेश आणि राजस्थान या दोन्ही राज्यात भाजपाने कंबर कसली होती. त्यामुळे, येथील निवडणूक निकालाकडे विशेष लक्ष लागले होते. तर, या निकालांपूर्वीच अनेकांनी शर्यतही लावल्या होत्या. कोणत्या राज्यात कोणाचं सरकार येणार, कोणत्या मतदारसंघात कोणता उमेदवार जिंकणार? अशा शर्यतीही कार्यकर्त्यांमध्ये लागल्याचं पाहायला मिळालं. मध्य प्रदेशच्या छिंदवाडा येथेही दोन कार्यकर्त्यांमध्ये १ लाख रुपयांची शर्यत लागली होती.
व्यापारी राम मोहन साहू आणि प्रकाश साहू यांच्या छिंदवाडा मतदारसंघातील निवडणुकीत कोण जिंकणार? यावरुन शर्यत लागली होती. त्यानुसार, प्रकाश साहू यांनी शर्यत जिंकली असून त्यांना राम मोहन साहू यांच्याकडून १ लाख रुपये रक्कम मिळाली. त्यावेळी, प्रकाश साहू यांनी ही १ लाख रुपयांची रक्कम गौशाळेला दिली. यावेळी, शर्यत हरलेले राम मोहन साहू आणि त्यांचे मित्रही उपस्थित होते. खिलाडू वृत्तीने या दोघांनी ही शर्यत लावली आणि पूर्णही केली.
छिंदवाडा शहरातील लालबाग येथील रहिवाशी असलेल्या दोन व्यापाऱ्यांनी १७ नोव्हेंबर रोजी मतदान झाल्यानंतर १८ नोव्हेंबर रोजी छिंदवाडा मतदारसंघातील लढतीवर १ लाख रुपयांची शर्यत लावली होती. भाजपा उमेदवार विवेक बंटी साहू जिंकल्यानंतर राम मोहन यांना १० लाख रुपये देण्याचं प्रकाश साहू यांनी शर्यतीत कबुल केलं होतं. तर, कमलनाथ जिंकल्यानंतर प्रकाश साहूंना केवळ १ लाख रुपयेच मिळणार होते. या शर्यतीनुसार राम मोहन यांनी १ लाख रुपये देण्याचे मान्य केल होते.
दरम्यान, ३ डिसेंबर रोजी झालेल्या निवडणूक निकालात माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस उमेदवार कमलनाथ यांनी विवेक बंटी साहू यांचा ३६,५९४ मतांनी पराभव केला. कमलनाथ यांनी त्यांच्या बालेकिल्ल्यात १ लाख ३२ हजारांहून अधिक मतं घेतली. त्यामुळे राम मोहन साहू यांनी ही शर्यत हरली होती. ही शर्यत लावताना दोघांनीही अॅग्रीमेंट केलं होतं. त्यामध्ये, तीन साक्षीदारही घेतले होते. त्यांच्याकडे दोघांनीही शर्यतीची ठरलेली रोख रक्कम जमाही केली होती. आता, निकालानंतर प्रकाश साहू यांना १ लाख रुपये रक्कम देण्यात आली. मात्र, त्यांनी जिंकलेली ती रक्कम गोशाळेला दान केली.