अजित पवारांना मोठा धक्का! राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला केवळ २०१ मते, लाजिरवाणा पराभव
By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2024 07:37 PM2024-06-04T19:37:18+5:302024-06-04T19:39:11+5:30
Lakshadweep Lok Sabha Election Result 2024: विशेष म्हणजे या मतदरासंघात शरद पवार गटाचे उमेदवारही रिंगणात होते. अजित पवार गटाच्या उमेदवाराचा लाजिरवाणा पराभव झाला.
Lakshadweep Lok Sabha Election Result 2024: देशात लोकसभा निवडणुकीच्या सात टप्प्यांची प्रक्रिया पार पडल्यानंतर आता मतमोजणी होत आहे. दिवसभरात अनेक फेऱ्या झाल्यानंतर हळूहळू कल स्पष्ट होत आहेत. एनडीएने ४०० पारचा नारा दिला असला तरी प्रत्यक्षात २९३ जागांवर आघाडीवर दिसत आहेत. तर इंडिया आघाडीने जोरदार मुसंडी मारली असून, अनेक उमेदवार विजयी झाले आहे. राज्यातही महाविकास आघाडीने जोरदार कमबॅक केले आहे. तर, महायुतीची मोठी पिछेहाट पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसअजित पवार गटाच्या एका उमेदवाराला केवळ २०१ मते मिळाली असून, लाजिरवाणा पराभवाला सामोरे जावे लागले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाने महाराष्ट्रात चार ठिकाणी तर लक्षद्विपमध्ये एका ठिकाणी आपले उमेदवार उभे केले होते. त्यापैकी बारामती, शिरूर आणि लक्षद्विपमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या उमेदवाराविरोधात थेट लढत होती. बारामती आणि शिरूरमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवारांचा विजय झाला. या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला पराभव पत्करावा लागला आहे. तर लक्षद्विपमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटाच्या उमेदवारांचा पराभव झाला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला केवळ २०१ मते, लाजिरवाणा पराभव
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडण्यापूर्वी लक्षद्वीप येथील जागेवर मोहम्मद फैजल हे खासदार होते. मात्र, अजित पवार यांनी वेगळा मार्ग पत्करून सरकारमध्ये सहभागी झाले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर खासदार मोहम्मद फैजल शरद पवार गटासोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे शरद पवार गटाकडून मोहम्मद फैजल आणि अजित पवार गटाकडून युसूफ टीपी यांना उमेदवारी देण्यात आली होती. परंतु, लक्षद्वीपच्या जागेवर काँग्रेस उमेदवार हमदुल्ला सईद यांचा विजय झाला. काँग्रेस उमेदवारांना २५ हजार ७२६ मते मिळाली. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार मोहम्मद फैजल यांना २३,०७९ मते मिळाली आहेत. तर अजित पवार गटाच्या उमेदवाराला केवळ २०१ मते मिळाली. अजित पवार गटाच्या उमेदवाराला लाजिरवाण्या पराभवाला समोरे जावे लागले. या मतदारसंघात NOTA पर्यायाला १३३ मते मिळाली.
दरम्यान, महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला केवळ एका जागेवर विजय मिळवता आला आहे. रायगडमधून सुनील तटकरे विजयी झाले. तर बारामतीतून सुनेत्रा पवार, शिरूरमधून शिवाजीराव आढळराव पाटील आणि धाराशीव अर्चना पाटील यांना पराभवाला सामोरे जावे लागले.