Lakshman Das Mittal Inspirational Success Story: माणूस नेहमी काही ना काही करून दाखवण्यासाठी प्रयत्नशील असतो. देशातील दिग्गज उद्योजकांच्या संघर्ष आणि यशाच्या अनेक कथा सांगितल्या जातात. कितीही संकटे आली तरी त्यावर मात करून यशोशिखरावर पोहोचल्याची अनेक उदाहरणे आपण पाहतो. असेच एक प्रेरणादायी कथा आहे. लोक जेव्हा निवृत्ती घेतात, तेव्हा या व्यक्तीने स्वतःचा व्यवसाय सुरू केला आणि वयाच्या ९२ व्या वर्षी तब्बल २० हजार कोटींच्या कंपनीचे मालक बनले.
ही प्रेरक कथा आहे लक्ष्मण दास मित्तल यांची. वयाच्या ६० व्या वर्षी लक्ष्मण दास मित्तल यांनी व्यवसाय सुरू केला. आता ९२ व्या वर्षी २० हजार कोटींच्या कंपनीचे मालक बनले आहेत. ज्या वयात लोक निवृत्त झाले, त्याच वयात लक्ष्मण दास मित्तल यांनी व्यवसाय करायला सुरुवात केली. ते सोनालिका समूहाचे अध्यक्ष आहेत, जे भारतातील तिसरे सर्वात मोठे ट्रॅक्टर उत्पादक आहेत. वयाच्या ९२ व्या वर्षी लक्ष्मण दास मित्तल हे भारतातील दुसरे सर्वात वयस्कर अब्जाधीश आहेत.
एलआयसी एजंट म्हणून केली करिअरला सुरुवात
विशेष म्हणजे लक्ष्मण दास मित्तल हे एकेकाळी एलआयसी एजंट होते. मित्तल यांनी आपला व्यवसाय उभारण्यासाठी कठोर परिश्रम घेतले. लक्ष्मण दास मित्तल यांनी वयाच्या ६०व्या वर्षी व्यवसाय सुरू केला आणि १९९६ मध्ये ट्रॅक्टर निर्मितीत प्रवेश करत सोनालिका ट्रॅक्टर्सची स्थापना केली. साधारणपणे वयाच्या ६० व्या वर्षी लोकांना निवृत्त होऊन आनंदी आणि शांत जीवन जगायला आवडते, परंतु लक्ष्मण दास मित्तल यांनी या वयातही काम करणे आणि संघर्ष करणे सोडले नाही. १९५५ मध्ये लक्ष्मण दास मित्तल एलआयसी एजंट म्हणून काम करू लागले. तेव्हापासून त्यांनी पगारातून काही पैसे वाचवायला सुरुवात केली. लक्ष्मण दास मित्तल यांनी आपली सर्व बचत कृषी यंत्रांशी संबंधित साइड बिझनेस सुरू करण्यासाठी वापरली. पण तो व्यवसाय दिवाळखोरीत गेला. मात्र, तरीही हार न मानता मित्तल यांनी संघर्ष सुरूच ठेवला. काही वर्षे संघर्ष केल्यानंतर मित्तल यांना मोठे यश मिळाले. लक्ष्मण दास मित्तल यांना अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सन्मानांनी सन्मानित करण्यात आले आहे. यात प्रतिष्ठित उद्योगरत्न पुरस्काराचा समावेश आहे.
दरम्यान, लक्ष्मण दास मित्तल यांच्या ट्रॅक्टर कंपनीचा उत्तर भारतीय राज्यांमध्ये मजबूत व्यवसाय आहे. सोनालिका ट्रॅक्टर हे पंजाब, हरियाणा आणि पश्चिम उत्तर प्रदेशातील खेड्यापाड्यातील शेतकऱ्यांची पसंती आहे. वयाच्या ९२ व्या वर्षीही लक्ष्मणदास मित्तल कंपनीचे कामकाज पाहतात. सोनालिका ट्रॅक्टर्सचा पंजाबमधील होशियारपूर येथे एक मोठा उत्पादन कारखाना आहे. सोनालिका ग्रुपचे पाच वेगवेगळ्या देशांमध्ये ५ प्लांट आहेत. कंपनी १२० हून अधिक देशांमध्ये ट्रॅक्टर निर्यात करते.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"