बडोदा : आईच्या वात्सल्याला साऱ्या जगात तोड नाही असे म्हणतात आणि ते खरेही आहे. प्रत्येकच आईचे आपल्या पिलांवर जिवापाड प्रेम असते. त्यांच्यासाठी वेळप्रसंगी जीव देण्यासही ती कचरत नाही. याचा प्रत्यय बडोद्यातील एका आईने पुन्हा आणून दिला. आपल्या मुलीचे प्राण वाचविण्यासाठी तिने चक्क एका महाकाय मगरीशी झुंज दिली आणि ती यशस्वीही झाली. दोघीही माय-लेकी मगरीच्या तावडीतून सुखरूप बचावल्या.येथून ४० कि.मी. अंतरावरील ठिकारिया मुबारक गावातील विश्वामैत्री नदीवर शुक्रवारी ही थरारक घटना घडली. दिवाली वांकर (५८) नामक महिला तिची १९ वर्षीय मुलगी कांता हिच्यासह नदीवर गेली होती. कांता नदीत आंघोळ करीत असताना अचानक एका मगरीने तिच्यावर हल्ला केला आणि तिचा उजवा पाय आपल्या जबड्यात ओढला. घाबरलेल्या कांताने जिवाच्या आकांताने आरडाओरड सुरू केली. दिवालीने मुलीची आर्त हाक ऐकली आणि ती धावतच तिच्याकडे आली. नदीतील दृश्य बघून तिच्या जिवाचा थरकाप उडला; परंतु धैर्यवान दिवालीने न घाबरता प्रथम कांताचा हात घट्ट धरला. दुसऱ्या हातात असलेल्या कपडे धुण्याच्या धोपटण्याने मगरीच्या जबड्यावर जोरदार वार केला. आणि आपल्या लाडक्या लेकीची मगरीच्या तावडीतून सुटका केली. कांताला लगेच जवळील इस्पितळात दाखल करण्यात आले असून तिची प्रकृती स्थिर आहे. (वृत्तसंस्था)४‘गावात अनियमित वीजपुरवठा होत असल्याने आम्हाला बऱ्याचदा कपडे धुण्यासाठी नदीवर जावे लागते आणि मगरीच्या हल्ल्याची जोखीमही पत्करावी लागते.’दिवाली, धाडसी माता
लेकीसाठी मातेने दिली मगरीशी झुंज!
By admin | Published: April 05, 2015 2:09 AM