सिकर : बडतर्फ केलेले मंत्री राजेंद्रसिंह गुढा यांच्या लाल डायरीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी राजस्थान सरकारवर टीकास्त्र सोडले. काँग्रेसच्या ‘लूट की दुकान’चे ताजे उत्पादन असलेली ही डायरी राज्यातील आगामी निवडणुकीत त्यांचा पराभव करेल, असे ते म्हणाले.
लाल डायरीत काँग्रेसच्या ‘काळ्या कृत्यांचा’ लेखाजोखा आहे. ही डायरी त्यांचा पराभव घडवून आणेल, असे पंतप्रधान म्हणाले. ते येथे आयोजित एका जाहीर सभेला संबोधित करताना बोलत होते. “राजस्थानमध्ये सरकार चालवण्याच्या नावाखाली काँग्रेसने केवळ लुटीचे दुकान चालवले असून, या दुकानाचे नवे उत्पादन म्हणजे राजस्थानची ‘लाल डायरी’ आहे, असे ते म्हणाले.
पंतप्रधान मोदींनी सव्वा लाख पंतप्रधान किसान समृद्धी केंद्रे राष्ट्राला समर्पित केली. या केंद्रांमुळे शेतकऱ्यांच्या समृद्धीचा मार्ग प्रशस्त होईल, असे ते म्हणाले. केंद्राने गेल्या नऊ वर्षांत शेतकरी बांधवांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले, असेही ते म्हणाले.
मुख्यमंत्री गेहलोत नेमके का नव्हते हजर?
पंतप्रधान कार्यालयाने आपले भाषण रद्द केले, असा आरोप राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी आरोप केला होता. त्यावर गेहलोत यांच्या कार्यालयानेच ते कार्यक्रमाला उपस्थित राहू शकणार नसल्याचे सांगितले होते, असे पीएमओने स्पष्ट केले.
मोदींनी सीकरमध्ये विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन केले. यासोबतच त्यांनी पीएम-किसान सन्मान निधीअंतर्गत देशातील शेतकऱ्यांना सुमारे १८ हजार कोटी रुपये पाठवले.
महागाईने लोकांचा चेहरा लाल
पंतप्रधानांच्या सभेनंतर आपल्या निवासस्थानी ‘लाभार्थी संवाद’ कार्यक्रमात मुख्यमंत्री गेहलोत म्हणाले की, केंद्र सरकार ‘खरी लूट’ करत आहेत. “लाल सिलिंडर ११५० रुपयांना व लाल टोमॅटो १५० रुपयांना विकला जात आहे. महागाईच्या ओझ्यामुळे लोकांचा चेहरा संतापाने लाल झाला आहे.
भ्रष्टाचाऱ्यांनी नाव बदलले, वर्तन नाही - पंतप्रधान
nविरोधी पक्षांनी त्यांच्या आघाडीला ‘इंडिया’ असे नवे नाव दिले होते. त्यावर पंतप्रधान मोदी यांनी टीका केली. nघराणेशाही तसेच भ्रष्टाचार करणाऱ्या लोकांनी आपल्या जमातीचे नाव बदलले. मात्र, त्यांचे वर्तन बदलले नाही. nसर्वसामान्य माणसांची स्वप्ने आमचे सरकार पूर्ण करीत असल्याने विरोधक संतप्त झाले आहेत, असे मोदी म्हणाले.