नवी दिल्ली : आयपीएलचे माजी अध्यक्ष ललित मोदी यांनी सर्व गुन्हे संपुआच्या राजवटीतच केले आणि तरीही त्या सरकारने मोदींविरुद्ध कोणतीही कारवाई मात्र केली नाही, असे सांगत केंद्र सरकारने गुरुवारी ललित मोदी प्रकरणात काँग्रेसलाही ओढण्याचा प्रयत्न केला.संपुआ सरकारने ललित मोदी यांच्या विरुद्ध कोणतीही कारवाई केली नाही, असे कायदामंत्री सदानंद गौडा म्हणाले, तर त्यांचे मंत्रिमंडळातील सहकारी राजीवप्रताप रुडी यांनी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज आणि राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्या राजीनाम्याची मागणी फेटाळून लावली. काँग्रेसने देशातील आपला जनाधार गमावला आहे. काँग्रेस एखाद्या मुद्याच्या शोधात आहे; पण या पक्षाला मुद्दाच सापडत नाही. काँग्रेसच्या राजवटीतच सर्व काही घडले. त्यावेळी काँग्रेसने ललित मोदींविरुद्ध कारवाई का केली नाही? काँग्रेसने मोदींना भारतात का आणले नाही? अशी कोणती गोष्ट काँग्रेसला असे करण्यापासून रोखत होती, असा सवाल गौडा यांनी केला. वसुंधरा राजे यांनी भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्याकडे भेटीसाठी वेळ मागितली नसल्याचे सांगण्यात आले. (लोकमत न्यूज नेटवर्क)
‘ललित’ गुन्हे संपुआ सरकारच्या काळातील
By admin | Published: June 19, 2015 3:26 AM