नवी दिल्ली - भारतामधील ज्येष्ठ वकील आणि माजी सॉलिसिटर जनरल हरीश साळवे यांनी तिसऱ्यांदा विवाह बंधनात अडकले आहेत. मात्र, त्यांच्या तिसऱ्या विवाहाच्या चर्चेबरोबरच आणखी जोरदार चर्चा सोशल मीडियावर होत आहे, ती म्हणजे या लग्न समारंभाला उपस्थित असलेल्या ललित मोदींची. भारतातून पलायन केलेला आरोपी ललित मोदी या लग्नसोहळ्याला उपस्थित होता आणि विशेष म्हणजे सेलिब्रेशनमध्ये सहभागीही झाला होता. ललित मोदींच्या सहभागाचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले आहेत.
बॉलिवूडचा भाईजान सलमान खान हिट अँड रन केस, कुलभूषण जाधव आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासारखे हायप्रोफाईल केस लढवलेल्या हरीश साळवे यांच्या विवाहाचे फोटो सोशल मीडियावर जोरादार व्हायरल झाले आहेत. वयाच्या ६८ व्या वर्षी त्यांनी बोहल्यावर चढण्याचा निर्णय घेतल्याने त्यांच्या विवाहाची जोरदार चर्चा आहे. त्यासोबतच त्यांच्या लग्नाला उपस्थित ललित मोदींवरुन आता विरोधक मोदी सरकाविरुद्ध आक्रमक झाले आहेत. काँग्रेस आणि शिवसेनेनं मोदी सरकारला आणि भाजपला यासंबंधित सवाल करत जोरदार निशाणा साधला. कारण, एक देश एक निवडणुकीसंदर्भात गठीत केलेल्या समितीत हरिश साळवेही आहेत.
शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी ट्विट करुन मोदी सरकावर निशाणा साधला आहे. तसेच, हरिश साळवे यांना भाजपाचे सरकारी वकील असा टोलाही लगावला. समान विवाह कायदा, बहु-विवाह कायद्यावरुन मोदी सरकार सातत्याने भाष्य करते, याचं मला अजब वाटत नाही. मात्र, पळपुट्या ललित मोदीच्या उपस्थितीवरुन प्रत्येकाला आश्चर्य वाटत आहे. जो भारताच्या कायद्यापासून पळून गेलाय, पण मोदी सरकारच्या प्रिय वकिलाच्या लग्नाच मजा करतोय. कोण कोणाची मदत करतोय, कोण कोणाला वाचवतोय, हा प्रश्नच आता उद्भवत नाही, असे ट्विट प्रियंका चतुर्वेदी यांनी केले आहे.
दरम्यान. साळवेंच्या या विवाह सोहळ्याला ललित मोदी, नीता अंबानी, उज्ज्वला राऊत यांसारख्या बड्या हस्ती उपस्थित होत्या. ब्रिटनमधील त्यांची मैत्रिणी त्रिना हिच्यासमवेत त्यांनी लग्न केले असून हा लग्नसोहळा ब्रिटनमध्येच पार पडला आहे.