ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 10 - राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांची कन्या आणि राज्यसभा खासदार मिसा भारती यांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) सोमवारी समन्स बजावला आहे.
गेल्या शनिवारी मिसा भारती, त्यांचे पती शैलेश कुमार यांच्या दिल्लीतील घिटोरनी, बिजवासन आणि सैनिक फार्म हाउसवर सक्तवसुली संचालनालयाने मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी धाडी टाकल्या होत्या. यावेळी इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस, फोन आणि काही कागदपत्रे सक्तवसुली संचालनालयाने जप्त केल्याचे सुत्रांनी सांगितले. दरम्यान, याप्रकरणी आज मिसा भारती यांच्यासह त्यांचे पती शैलेश कुमार यांना सक्तवसुली संचालनालयाने पीएमएलए कायद्याअंतर्गत समन्स पाठविला आहे.
दिल्लीतील घिटोरनी, बिजवासन आणि सैनिक फार्म हाउसवर सक्तवसुली संचालनालयाच्या अधिका-यांनी धाडी टाकल्या होती. ही फार्महाउस मिसा भारती आणि त्यांचे पती शैलेश कुमार अॅन्ड मेसर्स मिसाइल प्रिंटर्स अॅन्ड पॅकर्स प्रा.लि.शी संबंधित आहेत. तसेच, यासंबंधी आणखी दोन ठिकाणांवर सक्तवसुली संचालनालयाचे लक्ष असून, त्यांचा तपास लवकरच करण्यात येणार असल्याचे एका सक्तवसुली संचालनालयाच्या अधिका-यांने सांगितले.
दरम्यान, 8 हजार कोटींच्या बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी मिसा भारती यांचे सीए राजेश अग्रवाल याला सक्तवसुली संचालनालयाने बेड्या ठोकल्या आहेत. तसेच, सक्तवसुली संचालनालयाने राजेश अग्रवालला दिल्लीतील पटियाळा हाऊस न्यायालयासमोर हजर केले असता त्यांचे राजकीय पक्षांबरोबर संबंध असल्याचे समोर आले होते. प्राप्तिकर विभागाने दिल्ली आणि गुरुग्राम येथे लालूप्रसाद यादव यांच्याशी संबंधित कंपन्या अशा सुमारे 22 ठिकाणी छापे मारले होते. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार हे छापे 1 हजार कोटींच्या बेहिशेबी मालमत्तेच्या व्यवहाराच्या आरोपावरून मारण्यात आले होते. तसेच, गेल्या 15 वर्षांत डझनांहून अधिक बनावट कंपन्यांच्या माध्यमातून हजारो कोटी रुपयांचा काळा पैसा पांढरा केल्याचा आरोप आहे.