नवी दिल्ली : नितीशकुमार यांच्या शपथविधी कार्यक्रमात राजदचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी मला जवळ ओढत आलिंगन दिल्याचा खुलासा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सोमवारी केला. लालूप्रसाद यादव यांना आलिंगन देणे म्हणजे भ्रष्टाचाऱ्याला साथ देणे ठरते, असे सांगत विरोधकांनी टीकेची झोड उठविल्यानंतर केजरीवालांवर बचावाची पाळी आली आहे.आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते भाजपच्या विरोधात आहेत. नितीशकुमार हे एक चांगले व्यक्ती असून त्यांनी केलेल्या चांगल्या कामाला आम्ही बिहार विधानसभा निवडणुकीत समर्थन दिले होते. मी राष्ट्रपती भवनात गेलो तेव्हा सर्वपक्षीय नेते भेटले होते. नितीशकुमार यांच्या शपथविधीच्या वेळी लालूप्रसाद यादव व्यासपीठावर होते. त्यांनी मला जवळ ओढत आलिंगन दिले आणि माझा हात वर केला. आम्ही कोणतीही युती केलेली नाही. आम्ही त्यांच्या भ्रष्टाचाराविरुद्ध आहोत. आम्ही नेहमीच भ्रष्टाचाराला विरोध करू, असे केजरीवाल यांनी पक्षाच्या राष्ट्रीय परिषदेच्या बैठकीत स्पष्ट केले. आमचा घराणेशाहीला विरोध आहे. लालूप्रसाद यांचे दोनही पुत्र मंत्री आहेत. आमचा त्यालाही विरोध आहे. लालूप्रसाद यांना आलिंगन देत असल्याचे छायाचित्र प्रकाशित होताच लोक मला प्रश्न विचारू लागले आहेत. त्याबद्दल मी समाधानी आहे. आम्ही वेगळे आहोत हेच त्यामागचे कारण आहे. अन्य नेते लालूजींना आलिंगन देतात तेव्हा कुणीही सवाल करीत नाहीत. हे आमच्यासाठी चांगले आहे, असे ते म्हणाले. आपचे बडतर्फ नेते योगेंद्र यादव यांनी केजरीवालांचे कृत्य लाजिरवाणे असल्याची टीका केली होती. सोशल मीडियावरही सडकून टीका सुरू होती.(वृत्तसंस्था)२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत आमचा पक्ष स्पर्धेत असणार नाही. पंजाबमध्येही दिल्लीप्रमाणे संधी मिळावी असे आम्हाला वाटते. लोकसभा निवडणुकीच्या मागे लागू नये, असे संकेत केजरीवाल यांनी यावेळी पक्षकार्यकर्त्यांना दिले. आम्ही सत्तेच्या राजकारणात नाही. लोक विचारतात २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत उतरणार काय? नाही हेच आमचे उत्तर आहे. दिल्लीचा विजय चमत्कारिक होता. एका पाठोपाठ निवडणुका न लढता कठोर परिश्रमाला आणि प्रामाणिकतेला आम्ही महत्त्व देत आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले.
लालूंनीच मला मिठी मारली
By admin | Published: November 24, 2015 12:09 AM