लालूप्रसाद व रमणसिंग यांची एनएसजी सुरक्षा निघणार
By admin | Published: February 21, 2015 12:50 AM
वादग्रस्त भाजपा आमदारांना झेड श्रेणीची सुरक्षा
वादग्रस्त भाजपा आमदारांना झेड श्रेणीची सुरक्षा नवी दिल्ली- देशभरातील अतिविशिष्ट व्यक्तींसाठीच्या सुरक्षा व्यवस्थेत महत्त्वाचे फेरबदल करण्यात येणार असून छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमणसिंग आणि राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांच्या सुरक्षा व्यवस्थेत यापुढे राष्ट्रीय सुरक्षा गार्डचे(एनएसजी) ब्लॅक कॅट कमांडोज राहणार नाहीत. शारदा घोटाळ्यातील आरोपी मतंगसिंग यांची झेड प्लस सुरक्षा मात्र कायम असणार आहे. केंद्रीय गृहसचिव एल.सी. गोयल यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत सर्व अतिविशिष्ट व्यक्तींना सरकारतर्फे पुरविण्यात आलेल्या सुरक्षेचा आणि त्यांना असलेल्या धोक्याचा आढावा घेण्यात आला. पंजाबचे माजी पोलीस महासंचालक के.पी.एस. गिल, केंद्रीय मंत्रिद्वय नितीन गडकरी आणि जितेंद्र सिंग यासारख्या महत्त्वाच्या व्यक्तींना देशभरात झेड प्लस सुरक्षा कायम ठेवण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. सूत्रांनी यासंदर्भात शुक्रवारी येथे दिलेल्या माहितीनुसार लालूप्रसाद आणि नक्षल्यांपासून जीवाला धोका असलेले रमणसिंग यांच्या सुरक्षा व्यवस्थेतील एनएसजी कमांडो परत बोलावण्याचा निर्णय झाला असला तरी अद्याप यासंदर्भातील आदेश जारी झालेला नाही. या दोघांच्या सुरक्षेतील एनएसजी कमांडोंची जागा केंद्रीय राखीव पोलीस दलाचे जवान घेतील, अशी अपेक्षा होती. लालूप्रसाद यांना दिल्ली आणि बिहारमध्ये झेड प्लस सुरक्षा मिळेल तर रमणसिंग यांची केंद्रीय सुरक्षा व्यवस्था फक्त छत्तीसगडपुरतीच मर्यादित राहील. याशिवाय ज्या नेत्यांची सुरक्षा काढृन घेतली जाणार आहे त्यात काँग्रेसचे नेते मनीष तिवारी आणि श्रीप्रकाश जयस्वाल यांचा समावेश आहे. दोघांनाही झेड श्रेणीची सुरक्षा आहे. रिता बहुगुणा जोशी, जितीनप्रसाद, पी.एल. पुनिया आणि सलीम शेरवानी हे काँग्रेस नेतेही आता सुरक्षेविना असतील. रिलायन्स इंडस्ट्रीजचे मुकेश अंबानी यांची झेड सुरक्षा महाराष्ट्रात कायम राहील तर केरळचे राज्यपाल आणि भारताचे माजी सरन्यायाधीश पी. सदाशिवम यांना प्रथमच ही सुरक्षा प्रदान केली जाणार आहे. झेड प्लस श्रेणीत स्वयंचलित शस्त्रांनी सज्ज २४ ते ३६ जवान २४ तास तैनात असतात. तर झेड श्रेणीत ही संख्या १६ ते २० असते. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना दिल्ली वगळता संपूर्ण देशात झेड प्लस सुरक्षा राहील. पक्षाचे इतर नेते आणि केंद्रीय मंत्रिद्वय सय्यद शाहनवाज हुसेन आणि राजीव प्रताप रुडी यांची झेड सुरक्षा कायम राहील. दुसरे एक मंत्री राधा मोहन सिंग यांना पहिल्यांदाच झेड सुरक्षा मिळणार आहे. मुजफ्फरनगर दंगलीतील आरोपी आणि भाजपाचे सहारनपूरमधील आमदार सुरेश राणा आणि संगीत सोम यांना आता झेड सुरक्षा दिली जाणार आहे. याशिवाय भाजपाचे गोरखपूर येथील वादग्रस्त खाासदार योगी आदित्यनाथ यांना सुद्धा वाय श्रेणीतील सुरक्षा देण्यात आली आहे. याअंतर्गत चार सुरक्षा जवान त्यांच्या सुरक्षेत तैनात असतील. अमरसिंग, बेणीप्रसाद वर्मा आणि आरपीएन सिंग यांची सुरक्षा व्यवस्था कमी करण्यात आली आहे. आता त्यांना झेड ऐवजी वाय श्रेणीची सुरक्षा मिळेल. (वृत्तसंस्था)