ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 8 - देशाच्या राजकारणात एक नवं नातं जोडलं जाण्याचं वृत्त येत आहे. आम्ही बोलतोय राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव आणि योग गुरू बाबा रामदेव यांच्याबाबत. जर सर्व काही सुरळीत राहिलं तर दोघं लवकरच नातेवाईक बनू शकतात.
दोघांकडून या बातमीला दुजोरा देण्यात आलेला नसला तरी दोघांमधील वाढलेल्या जवळकीमुळे चर्चेला उधाण आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार दोघांमध्ये याबबात अनेकदा चर्चाही झाली आहे.
यावर्षी लालू यादव यांच्या घरी छठ पूजा देखील झाली नाही. घरामध्ये सून आल्यावरच पूज होईल असं लालूंची पत्नी आणि बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांनी म्हटल्याचंही वृत्त आहे. आतापासूनच या नव्या नात्याबाबत अनेक शक्यता वर्तवण्यात येत आहे. जर दोघांमध्ये नव्या नात्याची सुरूवात झाली तर बिहारच्या राजकारणातही मोठ्या उलटफेरची शक्यता वर्तवली जात आहे. कारण, रामदेव हे भाजपच्या अत्यंत जवळचे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, बाबा रामदेव आपल्या भाचीचं लग्न लालूंचा मोठा मुलगा तेजप्रताप यादव सोबत लावून देण्यास इच्छुक आहेत. बाबा रामदेव यांनी लालू यादवांच्या जावयाची बिहारमध्ये पतंजलीचे वितरक म्हणूनही नियुक्ती केली आहे. यावर्षीच रामदेव हे लालूंना भेटायला त्यांच्या घरीही गेले होते. यावेळी त्यांनी पतंजलीचे प्रोडक्ट्स लालूंना भेट दिले. तसेच रामदेव यांचा बचाव करताना त्यांनी रामदेव यांच्यावर लावण्यात आलेले सर्व आरोप फेटाळले. या भेटीत रामदेव यांनी पतंजलीच्या क्रिमने लालू यादव यांच्या चेह-याची मसाजदेखील केली होती.