नवी दिल्ली, दि. 1 - राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालूप्रसाद यादव यांनी पुन्हा एकदा नितीश कुमार यांच्यावर निशाणा साधला आहे. नितीश कुमार यांना सत्तेची हाव असून, ते राजकारणातले पलटूराम आहेत, असे लालूप्रसाद यादव म्हणाले आहेत. मी नितीश कुमार यांच्याहून खूप ज्येष्ठ आहे. नितीशचा आदर्शवाद हा खोटा आहे. नितीश पहिल्यांदा आमच्याशी चांगले वागत होते. मात्र आता आम्हाला त्यांनी बाजूला केलंय.
नितीश यांना मी सुरुवातीपासून ओळखतो. नितीश यांना मीच पुढे आणलं. जयप्रकाश नारायण यांच्या काळात मी नितीश यांना विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून राजकारणात उतरवलं. विद्यापीठात निवडणुकासाठी थेट उभं करून मतं मिळवून दिली. जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनावेळी नितीश यांना कोणीच ओळखत नव्हतं. त्यावेळी मीच त्यांना पुढे आणलं. सुशील मोदीसुद्धा हाफ चड्डी घालून माझ्या समोर फिरत असे. नितीश कुमार हे सत्तेसाठी हापापलेले आहेत. ते एनडीएसोबत मिळून जय श्रीराम बोलतायत. माझा नितीश यांच्यावर कधीच विश्वास नव्हता.
तेजस्वीच्या लोकप्रियतेमुळे नितीश कुमार घाबरले होते. तेजस्वीसंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर नितीश यांचं मौन बरंच काही सांगून जातं. नितीश कुमार माझ्या मुलांना त्रास देत होते. आणि ते त्यांचा बळी देण्याचा प्रयत्न करत होते. तेजस्वीच्या प्रश्नावर विधानसभेत नितीश कुमार मान झुकवून बसले होते. नितीश यांनी 2014च्या निवडणुकीत आमचा वापर केला. मुलायम सिंह यांच्या सांगण्यावरून नितीश कुमारांना महागठबंधनचे नेते बनवण्यात आले. मात्र त्यांनी त्याचा मान ठेवला नाही, असं म्हणत लालूप्रसाद यादवांनी नितीश कुमार यांना लक्ष्य केलं.
2019च्या लोकसभा निवडणुकीत नवी दिल्लीला नरेंद्र मोदींशिवाय कोणताही दुसरा पर्याय नाही, असं नितीश कुमार काल म्हणाले होते. बिहारमध्ये एनडीएसोबत संसार थाटल्यानंतर नितीश कुमारांनी पत्रकार परिषद घेऊन मोदींशिवाय देशाला पर्याय नसल्याचं म्हटलं होतं. नरेंद्र मोदींशी सामना करण्याची क्षमता कोणातच नाही, 2019मध्येही नरेंद्र मोदीच पंतप्रधान असतील. 2019मध्ये मोदी पुन्हा पंतप्रधानपदी विराजमान होतील का, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता नितीश कुमारांनी हे उत्तर दिलं होतं.नितीश कुमार यांनी लालूप्रसाद यादव यांच्यावर टीका केली आहे. काही जण धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली पैसा कमावत आहेत. हे मी कसं सहन करू शकतो. माझ्याजवळ दोनच मार्ग होते, एक तर भ्रष्टाचाराशी तडजोड करावी अन्यथा लोकांच्या टीकेचं धनी व्हावं. मी कोणत्याही टीकेला घाबरत नाही. 'त्यांच्या'साठी धर्मनिरपेक्षता म्हणजे चादर ओढून पैसा कमावणं आहे. नोटाबंदी आणि सर्जिकल स्ट्राइकला समर्थन दिल्यानंतरही माझ्यावर अनेकांनी टीका केली. मात्र मी सुरुवातीपासूनच मोदींच्या निर्णयांसोबत होतो, असंही नितीश कुमार म्हणाले होते.