बिहारमध्ये यावर्षाच्या उत्तरार्धात विधानसभेची निवडणूक होणार आहे. तत्पूर्वी सध्या बिहारमध्ये घडत असलेल्या काही घडामोडींमधून राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी उलथापालथ होईल, असे संकेत मिळत आहेत. त्यातच बिहारमधील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना पुन्हा एकदा सोबत येण्याची ऑफर दिली आहे. लालू प्रसाद यादव यांच्या या विधानामुळे चर्चांना उधाण आले आहे. एका युट्युब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीमध्ये लालू प्रसाद यादव यांनी सांगितले की, नितीश कुमार हे आमच्यासोबत आले तर त्यांचं स्वागतच आहे. आम्ही नितीश कुमार यांना माफ केलं आहे. दरम्यान, लालू प्रसाद यांच्या या विधानावर आता नितीश कुमार यांचीही प्रतिक्रिया समोर आली आहे.
लालूप्रसाद यादव यांच्या या वक्तव्यावर पत्रकारांनी प्रतिक्रिया विचारली असता नितीश कुमार यांनी ‘’ते काय बोलत आहेत? सोडून द्या’’, एवढंच त्रोटक विधान केलं. लालूप्रसाद यादव यांनी केलेल्या विधानावर नितीश कुमार यांनी याहून अधिक प्रतिक्रिया दिली नाही. तर लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर केंद्रीय मंत्री आणि जेडीयूचे वरिष्ठ नेते ललन सिंह यांनी सांगितले की, ते काय बोलतात, काय नाही याबाबत आम्हाला काही माहिती नाही आहे. त्यांच्या बोलण्याला काही अर्थ नाही आहे. आम्ही एनडीएमध्ये आहोत.
लालू प्रसाद यादव यांनी एका खाजगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की, आमचे दरवाजे नितीश कुमार यांच्यासाठी खुले आहेत. नितीश कुमार यांनी सोबत येऊन काम करावं. जर नितीश कुमार यांना सोबत यायचं असेल तर आम्ही त्यांचं स्वागत करू. नितीश कुमार यांनी आमच्यासोबत यावं आणि मिळून काम करावं. त्यात कुठलीही अडचण येणार नाही. या वर्षी बिहारमध्ये होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नितीश कुमार यांचं विधान महत्त्वपूर्ण मानण्यात येत आहे.