Lalu Prasad Yadav ED Inquiry: सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) सोमवारी राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यांची सुमारे १० तास चौकशी केली. रेल्वेतील कथित 'लँड फॉर जॉब' घोटाळ्यात मनी लाँड्रिंगच्या चौकशीसंदर्भात एजन्सीने लालूंची चौकशी केली. लालू पहिल्यांदाच तपास यंत्रणेसमोर हजर झाले होते. सकाळी अकराच्या सुमारास ते मुलगी मीसा भारतीसोबत पाटणा येथील ईडी कार्यालयात पोहोचले. मिसा यांना आत जाऊ दिले नाही. ईडीने लालूंना तब्बल १० तासांच्या चौकशीत ७० प्रश्न विचारले. रात्री नऊच्या सुमारास लालू यादव ईडी कार्यालयातून बाहेर आले. या प्रकरणाच्या तपास अधिकाऱ्याने मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पीएमएलए) लालूंचे जबाब नोंदवले.
चौकशी करण्यासाठी दिल्लीहून ईडीच्या अधिकाऱ्यांचे एक पथक रविवारी पाटणा येथे पोहोचले होते. त्यांनी लालूंना सुमारे ७० प्रश्न विचारल्याचे सांगितले जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लालूंना प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी दीड ते दोन मिनिटे लागली. नोकऱ्या देण्याच्या बदल्यात किती लोकांकडून जमिनी घेतल्या? हा त्यातील सर्वात महत्त्वाचा प्रश्न होता असे म्हटले जात आहे.
दिल्लीतील मालमत्तेबाबत माहिती
ईडीने पाटणा येथील मराचिया देवी कॉम्प्लेक्समधील फ्लॅटच्या खरेदी-विक्रीबाबत प्रश्न विचारले. याशिवाय पाटण्यात घेतलेल्या १० हजार ५२९२ चौरस फूट जमिनीबाबतही प्रश्न विचारण्यात आले. दिल्लीतील न्यू फ्रेंड्स कॉलनीच्या मालमत्तेबाबत प्रश्न विचारण्यात आले. तसेच मेसर्स एके इन्फोसिस्टम प्रायव्हेट लिमिटेडला विकलेल्या जमिनीची माहिती घेण्यात आली.
'अबू दोजानाबाबत विचारला प्रश्न'
एके इन्फोसिस्टम प्रायव्हेट लिमिटेडला जमीन विकणाऱ्या व्यक्तीच्या दोन पुतण्यांना रेल्वेत नोकरी देण्यात आली. चार भूखंड केवळ ७.५ लाख रुपयांना खरेदी केले गेले आणि माजी मुख्यमंत्री राबरी देवी यांनी अबू दोजानाला ते ३.५ कोटी रुपयांना विकले याबद्दलही प्रश्न विचारण्यात आल्याचे सांगितले जात आहे.